परभणी, प्रतिनिधी दि. ८: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. 'चला जाणूया नदीला' या उपक्रमांतर्गंत जिल्ह्यातील दुधना नदी संवर्धनाबाबत जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी आज आढावा बैठक घेतली. 

 जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके, उपक्रमाचे समन्वयक रमाकांत कुलकर्णी यांच्यासह जिल्हा प्रशासनातील विविध विभागप्रमुख दूरदृष्य संवादप्रणालीव्दारे बैठकीला उपस्थित होते. 

उपक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा प्रशासनातील प्रत्येक विभागाने सक्रिय सहभाग नोंदवायचा असून, जिल्ह्यातील पाण्याचा कृती आराखडा तयार करायचा आहे. तसेच जिल्ह्यातील पाण्याचे अंदाजपत्रक बनविण्यासाठी सर्व विभागांनी आवश्यक माहिती लवकरात लवकर पाठवावी. तसेच सर्वांनी पुढाकार घेऊन जल जनजागृती यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी केले.

या उपक्रमामुळे गावा-गावांतून नदीप्रेम वाढेल, जनतेने नदीचे शक्य तितके संरक्षण करावे, यासाठी ही चळवळ राबविण्यात येत असल्याचे त्या म्हणाल्या.

 नदीचे नकाशे, वापर, त्यावर आधारित लोकसंख्या, पाणीवाटप संस्था, नदी काठावरील गावे आदी माहिती गोळा करण्यासाठी अंगणवाडी ताई, सरपंच, शाळा महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्यांची मदत घेण्याचे त्यांनी सांगितले.

 दुधनेच्या पाणलोट क्षेत्रातील कामे, पाणीधारण क्षमता, पीकनिहाय माहिती, जनावरे, यात्रा, बाजाराला येणा-या नागरिकांची संख्या, पीकनिहाय आकडेवारी, बारमाही, हंगामी पाणी वापर आदी माहितीचा यात समावेश आहे. ही माहिती मिळाल्यानंतर त्याबाबतची प्रश्नावली गूगल फार्ममध्ये भरून अपलोड करता येईल. यासाठी अधिका-यांनी योग्य समन्वय ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

जलपुरुष राजेंद्र सिंग यांच्या पुढाकारातून ७५ नद्या अमृतवाहिन्या व्हाव्यात, यासाठी नदी परिक्रमा सुरू करायची आहे. नदीला पूर्वीच्या स्थितीत म्हणजे प्रदूषणमुक्त आणि नैसर्गिक प्रवाहात वाहावी, यासाठी उपाययोजना करणे आवश्यक असून सर्वांनी सहभाग वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले. यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याबाबतचे आदेश सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले असल्याचे श्री. कुलकर्णी यांनी सांगितले. 

विद्यार्थी, युवक आणि समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे. आतापर्यंत नदी, पाणी आणि वाळूचा सर्वाधिक वापर करून नुकसान केले आहे. मात्र आता सार्वजनिक संस्थांनी नदीकेंद्रित व्यवस्थापन करणे, लोकभावना जागृत करून सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन श्री. कुलकर्णी यांनी केले.