*धर्माबाद तालुक्यातील प्रकार*

 महावितरण ने आपला कारभार पारदर्शक होण्यासाठी अनेक हायटेक योजना कृतीत आणल्या असल्यातरी महावितरण चा मुख्य आर्थिक स्त्रोत म्हणून ओळखल्या जाणारा अचुक मीटररिडींग व वेळेवर वीजदेयके पाठविण्याचा विभाग मात्र खाजगी ठेकेदाराकडे एका एजन्सीला सुपुर्द करण्यात आला असल्याने या ठिकाणी मात्र ग्राहकांना वेगवेगळ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. धर्माबाद तालुक्यात व शहरात सदरील एजन्सीकडून मीटररिडींग ची नोंद घेत असताना स्पष्ट व ठळक आकडेवारी दाखवणारा फोटो न घेता अनेक ग्राहकांना त्यांच्या वीजबिलावर अंदाजित रिडींग टाकण्यात येत आहेत व सदरील वीज प्रत्यक्षात वापरापेक्षा जास्त दाखविण्यात येत असल्याने या खाजगी एजन्सीच्या एकाधिकारपणाबद्दल ग्राहकांत रोष व्यक्त करण्यात येत आहे.

   वीज ग्राहकांनी वापरलेल्या विजेच्या युनिटाची अचूकपणे नोंदणी व्हावी या करिता महावितरण ने फोटोमीटर रिडिंग चा फार्मूला प्रयोगात आणला यातून ग्राहक जेव्हढे वीजयुनिट वापरतात तेव्हढ्याच युनिटाचे देयके द्यावे लागत असे धर्माबाद तालुक्यातील मीटररिडिंगची नोंद घेण्यासाठी एका खाजगी एजन्सीला ठेका देण्यात आला सदरील एजन्सीने तालुक्यात दैनंदिन कामापूरते शुल्क देऊन मीटररीडिंग नोंदणी केली विशेष म्हणजे प्रत्येक ग्राहकांनी वापरलेली वीज त्या रीडिंग मध्ये अचूकपणे नोंद करणे अनिवार्य असतांना अनेक बिलावर ठळक मीटर रीडिंग फोटोला बगल देत सोईच्या पध्द्तीने वीज वापर युनिट दाखविण्यात येत आहेत. मागिल दोन ते तीन महिन्याच्या तुलनेत हे युनिट अधिकचे पडत असल्याने ग्राहकांत या एजन्सीच्या कारभाराबद्दल तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.

    विशेषतः सद्याच्या वातावरण पाहता कुलर,फ्रीज किंवा इतर साधने वापरात नसताना उन्हाळ्यापेक्षा अधिकचे युनिट बिलांवर पडत असल्याने खाजगीएजन्सीची अंदाजित मीटर रीडिंग पद्धत उघडपणे उमटून पडली आहे.

        तालुक्यात अनेक ठिकाणी व शहरात गल्लीबोळात या एजन्सीचा हा प्रतिनिधी कधी येतो व कधी वीज वापराचे युनिट नोद करतो हे त्या त्या घरातील ग्राहकांना देखील कळेनासे झाले मग वीज बिलावर दाखविण्यात येत असलेल्या नोंदी कोणत्या आधारे टाकण्यात येत आहेत असा सवाल देखील ग्राहकांतून व्यक्त केल्या जात आहेत. अचूकपणे मीटर ची नोंद घेणे व वापरलेल्या विजेची देयकपत्रे विहीत मुदतीत ग्राहकांना पाठवणे या एजन्सीचे कार्य असतांना अनेक ठिकाणी सोईच्या पध्दतीने कामे होत असल्याने लेटलतिफ वीज बिलांचा व अंदाजित मीटर रीडिंग नोंदीचा भुर्दंड मात्र ग्राहकांना सोसावा लागत असून यावर वरिष्ठांनी लक्ष घालणे गरजेचे बनले असल्याचे सुजाण नागरिक बोलून दाखवीत आहेत.

चौकट...

 उपरोक्त विषयावर उपकार्यकारी अभियंता सुमित पांडे यांच्याशी संपर्क साधला असता ज्या ग्राहकांना अशा प्रकारचा त्रास होत आहे त्यांनी कार्यालयात लेखी तक्रार दाखल करावी त्यानंतर उपरोक्त एजन्सी संदर्भात कार्यवाही साठी प्रस्ताव सादर करण्यात येईल असे ते म्हणाले. तसेच फौल्टीमीटर बाबतीत माहीती घेण्यात आली व आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.ग्राहकांना सुलभ सेवा देणे आमचे कर्तव्य आहे खाजगी एजन्सीकडून मनमानी कारभार होत असेल तर गय केली जाणार नाही असेही ते म्हणाले...