हिंजवडी: आक्षेपार्ह साहित्य असलेली भंगारमालाची गाडी पकडल्यानंतर कारवाई न करण्याच्या बदल्यात पैशांची मागणी केल्याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यातील 3 पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत.

पिंपरीचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. हवालदार ज्योतीराम बाबुराम झेंडे, पोलीस नाईक विशाल किसन बोऱ्हाडे, अशोक रावसाहेब घुगे अशी या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

एक महिन्यापूर्वी या तिघांनी चतुश्रृंगी-हिंजवडी रस्त्यावर भंगारमालाची गाडी पकडली होती. कारवाई न करता त्यांनी भंगार व्यावसायिकाकडून ३५ हजार रुपये घेतले. नंतर आणखी पैसे आणून देण्यासाठी त्याला धमकावण्यात आले. त्यासाठी त्याच्याकडे तगादा लावण्यात आला होता. या प्रकाराला वैतागून भंगार व्यावसायिकाने हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडेही तक्रार केली. प्राथमिक चौकशीत या तक्रारीत तथ्य आढळून आले.

याबाबतचा अहवाल पोलीस आयुक्तांकडे पाठवण्यात आला. या प्रकाराची गंभीर दखल घेत गैरवतर्णूक व शिस्तभंगाचा ठपका ठेवून पोलीस आयुक्तांनी तिघांवर निलंबनाची कारवाई केली. या कारवाईमुळे पिंपरी पोलीस दलात खळबळ उडाली आहे.