अकोला: स्थानिक सर्वोपचार रुग्णालयाच्या एनआयसीयूमध्ये उपचार घेत असताना मृत्यूमुखी पडलेल्या तीन दिवसांच्या चिमुकलीला तिच्या जन्मदात्यानेच रस्त्यावर फेकून दिल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे. या प्रकारामुळे सर्वोपचार रुग्णालयात खळबळ उडाली.

स्थानिक सर्वोपचार रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आवार भिंतीजवळ शुक्रवारी स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले व अर्भकाला सुरक्षा रक्षक व डॉक्टरांच्या मदतीने सर्वोपचार रुग्णालयात भरती केले.

यावेळी तपासणीदरम्यान सदर अर्भक सर्वोपचार रुग्णालयातीलच असल्याचे समोर आले. एनआयसीयूमध्ये शुक्रवारी दुपारी उपचारादरम्यान चिमुकलीचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी अंत्यसंस्कारासाठी तिचा मृतदेह मुलीचे वडील यांच्याकडे दिला. मात्र अंत्यसंस्कार न करताच जन्मदात्याने तिला रस्त्यावर फेकून दिले. सदर घटनेनंतर पोलिसांनी निर्दयी बापाला ताब्यात घेतले व त्याची कसून चौकशी केली.

जन्मतःच नव्हती अन्ननलिका

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील बेलारा येथील राहणारी मुक्ता यांची या एक नोव्हेंबर रोजी अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात प्रसूतीसाठी आल्या होत्या. प्रसुतीनंतर त्यांना झालेल्या मुलीला जन्मतःच अन्ननलिका नव्हती. त्यामुळे चिमुकलीवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारादरम्यान चिमुकलीचा मृत्यु झाला. त्यानंतर डॉक्टरांनी चिमुकलीचा मृतदेह मुलीच्या पित्याला दिला.