मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे गेल्या काही दिवसांपासून आजारपणामुळे रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, या आजारपणामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील शिबिराला उपस्थित राहतील की नाही याबाबत साशंकता होती. मात्र शरद पवार हे थेट रुग्णालयातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबीरासाठी उपस्थित राहिल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला.

दरम्यान, तब्येत साथ देत नसताना शरद पवार यांनी शिबिराला लावलेल्या हजेरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक भावूक पोस्ट लिहिली आहे. तब्येत साथ देत नसताना कार्यकर्त्यांमध्ये जोम आणि उत्साह आला पाहिजे आणि तो माझ्यामुळेच येईल याची त्यांना कल्पना असल्यामुळे आज ते शिबीरामध्ये दाखल झाले. त्यांच्या इच्छाशक्तीला सलामच करावा लागेल, असे आव्हाड या पोस्टमध्ये म्हणतात.

आज साहेब थेट इस्पितळातून निघून शिबीरामध्ये आले आणि परत निघून आता इस्पितळात दाखल झाले असतील. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत राजकारण करायच असतं आणि त्या प्रतिकूल परिस्थितीची दिशा बदलून ती आपल्या दिशेने वळवायची आणि त्यावरुन मार्गक्रमण करुन त्याच्यावर विजय प्राप्त करायचा हा त्यांचा स्थायी स्वभाव. आजही तब्येत साथ देत नसताना कार्यकर्त्यांमध्ये जोम आणि उत्साह आला पाहिजे आणि तो माझ्यामुळेच येईल याची त्यांना कल्पना असल्यामुळे आज ते शिबीरामध्ये दाखल झाले. त्यांच्या इच्छाशक्तीला सलामच करावा लागेल, असे जितेंद्र आव्हाड यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहेत.

तसेच राजकारण हे २४ तास करावं लागतं. त्याच्या अधे-मधे सुट्टी घेता येत नाही. हे त्यांनी साठ वर्षे केले आणि आजही ते करीत आहेत. राजकारण हे सकाळी ८ ते संध्याकाळी ६ पर्यंत करण्याचा विषय नाही. तर सकाळी ७ ते दुस-या दिवशी सकाळी ७ म्हणजे २४ तास ३६५ दिवस करण्याचा विषय आहे हे त्यांच्या क्रियेतून ते दाखवतात, असेही आव्हाड यांनी या पोस्टमधून म्हटले आहे.