चिपळूण: मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते सुमारे २४ लाख रुपयांची गोवा बनावटीची दारूची कारवाई ताजी असतानाच बुधवारी रात्री कळंबस्ते येथे एका घरात सुमारे ४ लाख ७२ हजार रुपयांची दारु येथील पोलीसांनी जप्त केली आहे. सलग दुसऱ्यांदा केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

राजाराम तानाजी जोईल (५०, रा. पागनाका, चिपळूण) अशी गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद पोलीस नाईक कृष्णा दराडे यांनी दिली आहे. 

दोन दिवसांपुर्वी मुंबई-गोवा महामार्गावरुन गोवा बनावट दारुची वाहतूक होत असल्याची माहिती चिपळूण पोलिसांना मिळाली. पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे यांच्यासह पथकाने कळंबस्ते येथे सापळा रचला. यावेळी मिळालेल्या माहितीनुसारचा कंटेनर याठिकाणी आला असता पोलीसांनी कंटनेर चालकाला गाडी बाजूला घेण्यास सांगितले. यानंतर गाडीची तपासणी केली असता सुमारे २४ लाख ४५ हजार ७२ रुपयांची गोवा बनावटीची दारु तर १० लाख रुपयांचा कंटेनर असा ३४ लाख रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात आला. याप्रकरणी कंटेनर चालकाला अटक करण्यात आली. 

ही घटना ताजी असतानाच कळंबस्ते येथील एका घरात गोवा बनावटीच्या दारुचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी तात्काळ बुधवारी रात्री ९.३० च्या सुमारास कळंबस्ते येथील मधुकर गमरे यांच्या घरावर छापा टाकला. यावेळी या कारवाईत सुमारे ४ लाख ७३ हजार रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारुचा साठा आढळून आला. याप्रकरणी पाग येथील राजाराम जोईल या व्यक्तीला ताब्यात घेत येथील पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्या घरात गोवा बनावटी दारुचा साठा सापडला ते घर जोईलने भाड्याने घेतले होते, अशी माहिती पुढे होत आहे.