सातारा: माण तालुक्यातील कुळकजाई सजातील तलाठ्याला ४ हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. युवराज एकनाथ बोराटे, असे तलाठ्याचे नाव आहे. कराड तहसील कार्यालयातील लोकसेवकावर कारवाई केल्यानंतर तिसऱ्याच दिवशी तलाठी लाच घेताना रंगेहाथ सापडला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचा जिल्ह्यात धडाका सुरु आहे.
कराडमध्ये ५० हजाराच्या लाचेची मागणी अधिकाऱ्याकडून कुणबी दाखला मिळवून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या कराड तहसील कार्यालयातील लोकसेवकावरील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी कारवाई करत गुन्हा दाखल केला. न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. कारवाई झालेला लोकसेवक कोणत्या अधिकाऱ्याकडून कुणबी दाखला मिळवून देणार होता. संबंधित अधिकाऱ्याचे नाव काय? त्या अधिकाऱ्यावर कारवाई होणार का? अशी चर्चा सुरु आहे.
तिसऱ्याच दिवशी तलाठ्याला रंगेहाथ पकडले - कराडमधील कारवाईनंतर तिसऱ्याच दिवशी एसीबीने माण तालुक्यातील तलाठ्याला ४ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. तक्रारदाराचे नोंदणीकृत कुलमुखत्यार पत्र व साठे खताच्या दस्ताची नोंद करुन सातबारा उतारा देण्यासाठी ४ हजाराची लाच घेताना हे तलाठी रंगेहाथ सापडला. युवराज एकनाथ बोराटे, असे तलाठ्याचे नाव आहे. दोन दिवसात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महसूल खात्याला दुसरा दणका दिला आहे. या घटनांमुळे जिल्ह्यातील महसूल खात्याची लक्तरे चव्हाट्यावर आली आहेत.