पुणे: पुण्यात चक्क फटाके लावण्यावरुन २ शेजाऱ्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. फटाके लावण्यावरून २ शेजाऱ्यांमध्ये वाद झाला आणि यातील एका परिवाराने शेजारी राहत असलेल्या घरात जाऊन तोडफोड आणि कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली असून पुण्यातील लोणीकंद परिसरात ३१ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. याप्रकरणी नितेश प्रसाद (वय १९) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती त्यावरुन पोलिसांकडून ३ जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणात फिर्यादी आणि आरोपी हे अनेक वर्षांपासून शेजारी राहायला असल्याने एकमेकांना ओळखतात. या दोघांमध्ये फटाके लावण्यासाठी जागेवरुन वाद झाले. फटाके आमच्या दारात नको लावू या वरुन दोन्ही बाजूने खडाजंगी झाली. याचा राग मनात धरून आरोपींनी त्यांच्या साथीदारासह फिर्यादी यांच्या घरात जाऊन पार्किंग मध्ये असलेल्या वाहनांचे नुकसान केले तसेच घरात असणाऱ्या कुटुंबातील काही सदस्यांना विटा, लाकडी दांडक्याने मारहाण देखील केली.

चिराग तिवारी (१९), सागर जावळे (२०), अमीन शेख (१८) यासह इतर २ जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर भारतीय दंडात्मक कलम अंतर्गत तसेच भारतीय शस्त्र कायदा कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१), (३) अनुशंगे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.