कान्हूर मेसाई ता. शिरुर येथे वारंवार बिबट्याचे जनावरांवर हल्ले होत असताना नागरिक भीतीच्या वातावरनात होते. येथील बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील नागरिकांकडून होत असताना वनविभागाच्या वतीने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात दि 1 रोजी शिरुर वनविभागाच्या पथकाला यश आले आहे.

                          कान्हूर मेसाई ता. शिरुर येथील ढगेवाडी येथे वारंवार बिबट्याचे नागरिकांना दर्शन होऊन कित्येकदा प्राण्यांवर बिबट्याने हल्ला केल्याने येथे पिंजरा लावण्याची मागणी केली असता शिरुर वनविभागाने वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्या माध्यमातून वनविभागाच्या वतीने येथील भाऊसाहेब शिंदे यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आलेला होता. सुर्यकांत ढगे, दत्ता शिंदे, दत्ता खर्डे हे शेताकडे गेले असता त्यांना सदर पिंजऱ्यात बिबट्या अडकला असल्याचे दिसून आले, याबाबतची माहिती शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांना मिळताच वनपाल ऋषिकेश लाड, वनरक्षक गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनमजूर हनुमंत कारकुड यांनी सदर ठिकाणी धाव घेत सुर्यकांत ढगे, दत्ता शिंदे, दत्ता खर्डे, अंकुश खर्डे, बाबुराव खर्डे, म्हातारबा खर्डे, रामभाऊ शिंदे यांसह आदी नागरिकांच्या मदतीने सदर बिबट्याला जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारण केंद्रात हलविले. दरम्यान बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून ग्रामस्थ व नागरिक वनविभागाच्या कामगिरीचे कौतुक करत आहेत.