श्रीवर्धन येथील पत्रकार संतोष चौकर यांच्यासह कुटुंबालादेखील जीवे मारण्याच्या धमक्या मोबाईलवर देण्यात येत होत्या. याप्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल असून, गुन्हा दाखल केल्यानंतरही पुढील पाच दिवस पत्रकार संतोष चौकर यांना रात्री एक ते तीन वाजेपर्यंत धमक्यांचे प्रकार सुरू होते.
श्रीवर्धन तालुक्यातील आराठी येथील एका अंतरधर्मीय विवाहाची बातमी संतोष चौकर यांनी प्रसिद्ध केली होती. सदरची बातमी ही अत्यंत सत्य व वस्तुनिष्ठ असल्याने या बातमीमुळे काही जणांना आपल्या पायाखालची वाळू सरसकल्यासारखी झाल्याने काही समाजकंटकांकडून धमक्यांचे फोन येत होते. सदर धमक्या देण्यामागे कोणाचा हात आहे याचाही पाठपुरावा करण्यामध्ये पोलीस प्रशासन अपयशी ठरले आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना पत्रकार संतोष चौकर यांनी लेखी निवेदन दिले असून, आपल्याला योग्य तो न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.