रत्नागिरी : एखाद्याचा हात दुखत असेल, कान, पाय दुखत असेल तर तो डॉक्टरकडे जातो. औषध घेतो. पण औषध घेऊनही गुण येत नसेल तर...? माणूस श्रध्देचा आधार घेतो. रत्नागिरीतील प्रसिध्द आरे-वारे गावच्या गर्द झाडीतल्या डोंगरात वसलेल्या घोडपदेवाला दुखऱ्या अवयवाबाबत नवस बोलला जातो, नवसपूर्तीनंतर दुखऱ्या अवयवाचा लाकडी अवयव देण्याची प्रथा भाविकांमध्ये दिसून येते.
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आणि श्रद्धा तितके भक्तीमार्ग दिसून येतात. कोकण भूमी ही तर अशाच अनोख्या श्रध्येय प्रथा, परंपरा, रुढी, चालीरितींसाठी प्रसिध्द आहे. अशाच अनोख्या प्रथेच्या देवस्थानांपैकी एक म्हणजे श्री क्षेत्र घोडपदेव. घोडपदेव हे देवस्थान रत्नागिरी तालुक्यातील प्रसिध्द आरे-वारे समुद्रकिनाऱ्याच्या उंच डोंगरात वसले आहे. एकीकडे पायथ्याशी असलेला स्वच्छ, सुंदर आरे-वारेचा समुद्र किनारा तर दुसरीकडे अत्यंत दुर्लक्षित असा घोडपदेव असा विरोधाभास याठिकाणी अनुभवायला मिळतो. किनारा, घोडपदेव यांचे मधलं अंतर फक्त पाच मिनिटांचे आहे. पण दाट निर्जन वस्तीत असलेला हा घोडपदेव ग्रामस्थ वगळता कुणालाच सहसा माहीत नाही.
कदाचित याच दुर्लक्षामुळे असेल, किंवा निर्जन जागेत, दाट झाडीत आणि अवाढव्य वटवृक्षाखाली घोडपदेव वसलेला असल्याने येथील वातावरण कमालीचं गुढ वाटतं. तशी पार्श्वभूमीच या देवस्थानाला लाभली आहे. आरे-वारे समुद्र किनाऱ्यावरिल डोंगरातून जो रस्ता जातो, त्याच डोंगरांच्या उंच टोकावर घोडपदेवाचे स्थान आहे. रस्त्याच्या डोंगर कटाईमुळे, झाडीमुळे घोडपदेवाचा रस्ता लवकर सापडतही नाही. रस्ता सोडून वर गेले की, डोक्यावर गर्द झाडीचं छत, पायाखाली लांबसडक चिऱ्यांची, गुळगुळीत प्राचीन घाटी लागते. ही घाटी थेट घोडपदेवाशी नेऊन सोडते. समोर चिरेबंदी चौथरा,गावक-यांनी त्याचे थोडं नुतनीकरण केलेलं असावे, या चौथऱ्याच्या मधोमध मोठा वटवृक्ष आहे. हा वटवृक्ष उंच नाही, डावीकडे, उजवीकडे अशा दोन दिशांना महाकाय विस्तारलेला आहे. त्याचं विस्तारलेपणाच मोठं गुढ वाटणारे वटवृक्षाच्या बुंधात एक उघडा गाभारा आहे. या गाभाऱ्यात एक पाषाण. हा पाषाण म्हणजेच घोडपदेव असे ऐकायला मिळते. वडाच्या फांद्यांना अनेक घंटा बांधलेल्या आहे. याशिवाय लाकडाचे विविध आकाराचे, डिझाईनचे पाळणे टांगलेले आहेत. लाकडाच्या कोरीव बाहुल्या तर खूपच पाहायला मिळतात. याशिवाय लाकडाने कोरलेले मानवी हात, कान, पाय असे अवयव आजू-बाजूला अर्पण केलेले आहे. यामुळे येथील परिसर अधिक गुढ वाटतो. त्यात घनदाट झाडीमुळं इथले वातावरण कायम झाकोळलेलं आहे. वटवृक्षाचा विस्तार संपताच उंच डोंगरावर विस्तारलेला सपाट कातळ दिसतो. गवतातून हा कातळ तुडवत पुढे जाताच उंच डोंगरावरुन आरे-वारेच्या समुद्राचे रम्य दर्शन घडते.
इथल्या प्रथेनुसार एखादा भाविक आपल्या व्याधीविषयी घोडपदेवाला नवस बोलतो. एखाद्याचा हात दुखत असेल तर हात बरा झाल्यास लाकडाचा हात देईन, असा नवस बोलला जातो, नवसपुर्तीनंतर लाकडाचा हात घोडपदेवाला अर्पण केला जातो. असे अनेक लाकडी अवयव येथे विखुरलेले दिसून येतात. मुल होत नसेल तर नवस बोलण्याचे प्रमाण मोठे, त्यामुळे मुल झाल्यानंतर नवसपूर्ती म्हणून अर्पण केलेले लाकडी पाळणे येथे बरेच पहायला मिळतात.