रत्नागिरी : वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी मियावाकी वने आता रत्नागिरी तालुक्यासह शहरी भागात उभारली जाणार आहेत. तालुक्यातील 5 ठिकाणी ही वने उभारली जाणार असून यासाठीच्या वृक्षलागवड, संगोपनाकरिता प्रशासकीय स्तरावर आराखडा तयार करण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षापासून सागरी भागात असलेली खारफुटीची जंगले नष्ट होऊ लागली असून, तेथे सिमेंट क्राँक्रिटचे बांधकाम होऊ लागले आहे. काही ठिकाणच्या भागात असलेला हरितपट्टाही अतिक्रमणामुळे नष्ट होऊ लागला आहे. याच अनुषंगाने आता प्रशासनाने जपानी पद्धतीच्या 'मियावाकी' तंत्रज्ञान वापरून वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे.

या मियावाकी पद्धतीमध्ये अगदी कमी जागेत अधिक झाडांची लागवड केली जाते. ही वृक्ष लागवड करण्यासाठी प्रशासनाने राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत (नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम) सुमारे दोन कोटींचा निधीही उपलब्ध झाला आहे. रत्नागिरी तालुक्यातील पाच ठिकाणी अशी वने तयार करण्यात येणार आहेत. यात प्रत्येकी पाचशे चौरस मीटर असे पाच प्लॉट तयार करण्यात येणार आहेत. प्रशासकीय आराखड्याला मान्यता मिळाल्यानंतर या जंगलाची निर्मिती करण्यात येणार आहे.