रत्नागिरी : येथील निराधारांचा आधारवड ठरलेल्या माहेर संस्थेमध्ये वर्षातील सर्व सण उत्सव साजरे होत असतात, या वर्षीची दिवाळी माहेर संस्थेमध्ये मोठ्या उत्साहात साजरी झाली आहे. संस्थेत दाखल निराधार प्रवेशितांना नवीन कपडे, फराळ याचे वाटप झाले आहे. त्यांचा आनंद द्विगुणीत करीत असतानाच रस्त्यावर उन वाऱ्यात काम करणाऱ्या गरीब मजुरांची ही दिवाळी माहेर संस्थेमुळे गोड झाली. आहे. रस्त्यावरील गरीब मजुरांना दिवाळीचा फराळ वाटप करीत त्यांनाही माहेर संस्थेच्यावतीने अधिक्षक, सामाजिक कार्यकर्ते सुनिल कांबळे, अमित चव्हाण, आशिष मुळे व सर्व कर्मचाऱ्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. कामामुळे ज्यांना दिवाळी करता येत नाही अशांना दिवाळीचा फराळ मिळाल्यामुळे खूप आनंद होतो असा अनुभव संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सांगितला. गरीब व तळागाळातील लोकांनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, यासाठी हा उपक्रम माहेर संस्था दरवर्षी राबवत आहे.