रत्नागिरी : शहरालगतच्या जे. के. फाईल्स साईभूमीनगर येथे मैत्रिणीच्या घरी युवकाचा मृतदेह आढळून आला. साहिल विनायक मोरे (22, शिवलकरवाडी-जाकीमिया रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे साहिलने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे त्याच्या मैत्रिणीकडून पोलिसांना सांगण्यात आले. तरूणाच्या नातेवाईकांनी मात्र घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान ऐन दिवाळीच्या प्रारंभालाच घडलेल्या या घटनेने शहर परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी १०.१५ च्या सुमारास ही घटना समोर आली. साहिल शहरातील एका मोटारसायकल शोरूममध्ये कामाला होता. शुक्रवारी सकाळी 8 च्या सुमारास तो नेहमीप्रमाणे कामाला जातो, असे सांगून घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो कामाला न जाताच ज़े के. फाईल्स नजीकच्या साईभूमीनगर येथे मैत्रिणीच्या फ्लॅटवर गेल्याचे समोर आले. त्याच ठिकाणी फ्लॅटमधील किचनमध्ये गळफास घेवून अत्यवस्थ स्थितीत तो मैत्रिणीला आढळून आल्याचे सांगण्यात आले.

या प्रकाराने भयभीत झालेल्या मैत्रिणीने साहिलच्या बहिणीला फोन करून घडल्या प्रकाराची माहिती दिली. साहिलची बहीण तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्याच्या बहिणीने मैत्रिणीच्या मदतीने साहिलला शहरातील एका खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी साहिलला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय नेण्याचा सल्ला दिला.

यानंतर त्या दोघींनी साहिलला जिल्हा रूग्णालयात दाखल केले. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती साहिलला मृत घोषित केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याची पोलिसांना खबर दिली. या प्रकरणी शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक माहितीसाठी तपासाची चक्रे गतिमान केली.

या घटनेची माहिती नातेवाईकांपर्यंत पोहचताच त्यांनीही जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. यात साहिल राहत असलेल्या भागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. घटनेची वस्तूस्थिती समोर येत नसल्याने नातेवाईकांनी शहर पोलिसांकडे मोर्चा वळवला व साहिलचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला पोलिसांनी सखोल तपास करण्याची मागणी नातेवाईकांनी केली.

रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी घटनास्थळी भेट देवून वस्तूस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. फॉरेन्सिक लॅबच्या टीमनेही पाहणी केली. पंचनाम्यात काही संशयास्पद बाबी तपास पटलावर घेण्यात आल्या असून सर्व शक्यतांचा विचार करून सखोल तपास सुरू झाला आहे.

शहर पोलिसांकडून साहिलच्या मैत्रिणीची कसून चौकशी करण्यात आली. साहिलचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, या बाबत शवविच्छेदन अहवालातून स्पष्टता येणार आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच तपासाची पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

रत्नागिरी ऐन उत्सवात घातपात, आत्महत्येच्या घटना 

रत्नागिरी शहर व लगतच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून एकापाठोपाठ घातपात व आत्महत्येच्या घटना समोर येत आहेत. ऑगस्ट महिन्यात गणपती उत्सवात रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत हिच्या खूनाचा पकार समोर आला. नवरात्रोत्सवात मुंबईतील सराफ व्यापारी किर्तीकुमार कोठारी यांचा खून झाला. यानंतर रत्नदुर्ग किल्ला परिसरात तन्वी घाणेकर हिचा मृतदेह आढळला. अलिकडच्या काळात रेल्वे ट्रकवर आत्महत्या केल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या. आता दिवाळीच्या तोंडावर युवकाच्या संशयास्पद मृत्यूने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.