चिपळूण : सध्या मुंबई - गोवा महामार्गाची दुर्दशा पाहता ज्येष्ठ नागरिक रेल्वेचा प्रवास पसंत करतात. औषधोपचार करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना वरचेवर मुंबईत जावे लागते. तरी कोकण रेल्वेने कोरोनाच्या काळात ज्येष्ठ नागरिकांचे बंद केलेले अर्धे तिकीट पुन्हा सुरु करावे व त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. कोकण रेल्वेकडून पूर्वी पुरुषांसाठी ६० आणि महिलांसाठी ५८ या वयोगटातील प्रवाशांना कोरोना पूर्वी सवलतीच्या दरात तिकिटे दिली जात होती. कोरोनाच्या काळात ती सवलत बंद केली होती. आताही ती सवलत बंद आहे, ती पुन्हा सुरू करावी, अशी मागणी शौकतभाई मुकादम यांनी केली आहे.