संगमेश्वर : तालुका पंचायत समिती आणि टीडब्लूजे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या महिला रोजगार मेळावा संपन्न झाला. हा मेळावा पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात घेण्यात आला.
या मेळाव्यात बोलताना आमदार शेखर निकम म्हणाले, कष्ट प्रामाणिकपणा आणि सचोटीने काम केल्यास यशाला गवसणी घालता येते. कोकणातील मंडळी कष्ट करायला कमी पडणार नाही. उद्योग क्षेत्रात टिकायचे असेल तर उत्पादना बरोबरच मार्केटिंग, पॅकेजिंग आणि ब्रँड या बाबी महत्वाच्या असून याचा प्रत्येकाने उपयोग करून उद्योग क्षेत्रात उच्च दर्जा गाठण्याचे प्रयत्न करावा. तसेच प्रकल्प अहवाल करण्यासाठी एकत्रितरित्या प्रयत्न केले जातील. याबरोबरच अनेक उद्योजकांची उदाहरणे देत ते कसे मोठे झाले याबाबत विवेचन केले.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने यांनी बोलताना कौशल्य विकास कार्यक्रम राबविले पाहिजेत, त्यातून उद्योगाच्या संधी निर्माण केल्या पाहिजेत. सर्वच विभाग एकत्र आल्याने अनेक समस्या मार्गी लागण्यास मदत होणार आहे. तंत्रज्ञान आणि पारंपरिक शेती यांची सांगड घालून नवीन तंत्रज्ञान अवलंबले पाहिजे तरच शेती व्यवसायात प्रगती होऊ शकेल असे मत व्यक्त केले.
उमेद अभियानाच्या संचालिका तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका नंदिनी घाणेकर मार्गदर्शन करताना म्हणाल्या बचत गटाच्या महिलांना कश्या प्रकारे उद्योग करता येऊ शकतात, मात्र मोठा उद्योग उभा करताना प्रकल्प अहवाल करणे ही समस्या त्यांच्या समोर उभी राहत आहे, या महिलांनी अपडेट मार्केटिंग शिकून घेतले पाहिजे, या ठिकाणी गुंतवणूकदार देखील आले पाहिजेत, आणि थेट व्यापार कसा करता येईल यावर भर बचत गटांना दिला पाहिजे आम्ही जिल्ह्याच्या यंत्रणा तुमच्या सोबत सदैव आहोत असे सांगितले
यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका नंदिनी घाणेकर, लीड बँकेचे एनडी पाटील, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एनएच आंधळे, नाबार्डचे व्यवस्थापक मंगेश कुलकर्णी,खादी ग्रामउद्योगचे व्यवस्थापक शैलेंद्र कोळथरे, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे डॉ.अतुल मोहड, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ.अभिजित कसाळकर, तहसीलदार सुहास थोरात, सोशल रिफार्मचे करंदीकर, सल्लागार हेमंत तांबे, गटविकास अधिकारी भरत चौगले, सहाय्यक गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शॅरन सोनावणे इ.उपस्थित होते.