रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने रत्नागिरी चेस अकॅडमीमार्फत आयोजित करण्यात आलेल्या कै. अनिल कानविंदे स्मृती खुल्या जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद रत्नागिरीच्या अलंकार कांबळे याने पटकावले. शहरातील मॅजिक स्क्वेअर चेस अकॅडमी येथे एकूण सहा फेऱ्यांमध्ये अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत अलंकारने अपराजित राहून साडेपाच गुण प्राप्त केले.
तर रत्नागिरीच्या यश गोगटे, अनिकेत रेडीज व वरद पेठे यांनी प्रत्येकी साडेचार गुणांसह अनुक्रमे दुसरा ते चौथा क्रमांक पटकावला. अनिकेत रेडीज याने देखील एकही सामना गमावला नाही परंतू त्याला सहापैकी एकूण तीन सामन्यात बरोबरी स्वीकारावी लागली. चार गुणांसह सोहम रुमडे पाचवा आला. १३ व ११ वर्षांखालील वयोगटातील उत्तेजनार्थ पारितोषिके आर्यन धुळप, निधी मुळ्ये व प्रणव एम जे यांनी प्राप्त केली.
या वर्षीची खुली राज्य निवड व अजिंक्यपद स्पर्धा लवकरच कोल्हापूर येथे पार पडणार आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याऱ्या बुद्धिबळपटूंची निवड सदर स्पर्धेतून करण्यात आली. सर्व विजेत्या खेळाडूंना रोख रकमेची बक्षिसे, चषक देऊन गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभ सौ. वेदिका मुळ्ये यांचे हस्ते पार पडला. या प्रसंगी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सभासद विवेक सोहनी, सुहास कामतेकर व चैतन्य भिडे उपस्थित होते.