संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील असुर्डे, आंबेड बु. ग्रुप आणि कोंड असुर्डे या तीन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी निवडणूक काल पार पडली. अनेकांचे या निकालाकडे लक्ष लागून राहिले होते. आंबेड बु. ग्रामपंचायतीच्या निकाल हाती आला आहे. यामध्ये मानसकोंड येथील सुहास मायंगडे विजयी झाले आहेत. तर कोंड असुर्डे ग्रामपंचायतीच्या महत्वपूर्ण ठरलेल्या निवडणुकीत गाव विकास पॅनेलच्या सिध्दीका बोले यांनी केवळ 6 मतांची विजय प्राप्त करुन थेट सरपंच पदी विराजमान झाल्या आहेत. कोंड असुर्डे ग्रामपंचायत इतिहासात प्रथमच सर्वात तरुण आणि 25 वर्षाच्या उमेदवार म्हणून कुमारी सिध्दी बोले यांना लोकांनी साथ दिली आहे..
कोंड असुर्डे ग्रामपंचायतीची अतिशय अटीतटीची निवडणूक झाली. या निवडणुकीत गाव विकास पॅनेल उभे करण्यात आले होते. थेट सरपंच पदासाठी सिध्दीका संदीप बोले विरुध्द सोनाली शिंदे यांच्यात लढत झाली. मात्र या लढतीत सोनाली चंद्रकांत शिंदे यांचा 6 मतांनी पराभव करुन सिध्दीका बोले यांनी निसटता विजय प्राप्त केला. कु. सिध्दीका बोले यांना एकूण 270 मते मिळाली तर सोनाली चंद्रकांत शिंदे यांना 264 मते मिळाली.
तर आंबेड बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी चार जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते. रघुनंद भडेकर, अनिरुध्द मोहिते, शोएब भाटकर आणि सुहास मायंगडे असे उमेदवार रिंगणात उभे होते. मात्र यामध्ये मानसकोंड येथील सुहास मायंगडे यांनी बाजी मारत थेट सरपंचपदाची माळ गळयात पडली आहे. मायंगडे यांना 766 मते मिळाली. रघुनंद भडेकर यांना 335 मते, अनिरुध्द मोहिते यांना 175 मते तर शोएब भाटकर यांना 68 मते मिळाली. तर आंबेड बु. ग्रामपंचायतीच्या सरपंचदासाठी चक्क 23 बाद मतांचा म्हणजे नोटाचा वापर करण्यात आला आहे.