संगमेश्वर : महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिवसेनेसोबत इतर घटक पक्षांना कमीअधिक प्रमाणात गळती लागली. कोकणात शिवसेनेचे दोन भागांत विभाजन झालेले पहायला मिळत असतानाच भारतीय जनता पार्टी अधिक भक्कम होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांचे निकटवर्ती म्हणुन ओळखले जाणार्या रमेश कानावले यांनी नुकतीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि त्यानंतर विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांचे कार्यालयात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजपा संगमेश्वर तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव, उपाध्यक्ष मिथुन निकम, सरचिटणीस डॉ. अमित ताठरे, विनोद म्हस्के आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
शेखर निकम यांच्या २०१९ मधील विधानसभा विजयात सिंहाचा वाटा असणारे रमेश कानावले हे चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे मुंबई संपर्कप्रमुख म्हणुन कार्यरत होते. कोकणातील मुंबईस्थित मतदारांना त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे वळवून शिवसेनेविरोधात मोट बांधली होती. त्यामुळेच निकम यांना स्वप्नवत विजय प्राप्त झाला होता.
कुणबी समाजासाठी कानावले यांचे योगदान उल्लेखनीय आहे. या समाजाची शैक्षणिक आणि सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारा कार्यकर्ता ही त्यांची ओळख भारतीय जनता पार्टीसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल असा विश्वास आमदार लाड यांनी व्यक्त केला. तर मा. मोदी साहेबांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कोकणात शाश्वत विकासासाठी सदैव कार्यरत राहण्याचे अभिवचन रमेश कानावले यांनी यावेळी दिले.