चिपळूण : राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी वाढीव निधीची तरतूद केल्याने गेली चार वर्षे रखडलेले रत्नागिरी बस स्थानकाचे काम पुन्हा सुरू झाले आहे. या बसस्थानकाबरोबरच कामाची सुरुवात झालेल्या चिपळूणच्या हायटेक बस स्थानकाबाबत मात्र शासन व एसटी महामंडळाच्या वरिष्ठ पातळीवरुन कोणत्याच हालचाली दिसून येत नसल्याने या वर्षीतरी कामाला मुहुर्त सापडेल का ? असा खोचक सवाल प्रवाशांमधून केला जात आहे. रत्नागिरीप्रमाणे चिपळूण बस स्थानकाच्या कामालाही 'बुस्टर डोस' मिळाला तर नक्कीच चिपळूणकरांच्या स्वप्नातील अत्याधुनिक बस स्थानक इथे उभे राहिल, अशी आशा त्या निमित्ताने व्यक्त केली जात आहे. सन २०१८ मध्ये जिल्ह्यातील
चिपळूण, रत्नागिरी, लांजा या तिन्ही बसस्थानकांचे काम एकाचवेळी सुरू झाले होते. मात्र, यातील एकही बस स्थानक उभे राहिलेले नाही. गेली चार वर्षे निधी अभावी तांत्रिक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे तर ठेकेदाराने केलेल्या दुर्लक्षामुळे या प्रकल्पांची कामे रखडली ती आजतागयत रखडलेली पाहायला मिळत आहे.
४ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर
चिपळूण बस स्थानकासाठी ४ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. मात्र, तरीही या प्रकल्पाचा पाया सुद्धा पुर्णत्वास गेलेला नाही. मुळठेकेदार असलेल्या स्कायलार्क कंपनीचे पोट ठेकेदार नेमून या कामाची सुरुवात केली खरी; परंतु रडतरखडत सुरू असणारे काम कोरोना कालावधीत ठप्पच झाले. यानंतर शिवसेनेचे तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी बसस्थानकात ठेकेदाराचे श्राद्ध घालून आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानंतर या कामाचे ठेकेदार बदलल्याचे बोलले जात होते. रखडलेले काम लवकरच सुरु व्हावे, यासाठी अनेक लोकप्रतिनिधींनीही प्रयत्न सुरू केले. त्यानंतर तरी या कामाला गती मिळेल, अशी येथील जनते अपेक्षा होती. मात्र, त्यावरही पाणी फेरले गेले.
"चिपळूण बस स्थानकाच्या नवीन इमारतीचे काम सुरू करण्याबाबत सर्व ते निर्णय वरिष्ठ पातळीवर होत असतात. मात्र, सध्या आम्हाला मिळत असलेल्या माहितीनुसार दिवाळीनंतर बसस्थानक कामाला पुनश्च प्रारंभ"
- रणजीत राजेशिर्के,आगार व्यवस्थापक, चिपळूण