औरंगाबादचे दोन केंद्रीय राज्यमंत्री , राज्याचे तीन कॅबिनेट मंत्री आणि एक विरोधी पक्षनेता असे सहा जण सरकारमध्ये आहोत . पण एवढी मंत्रिपदे मिळूनही विकास झाला नाही तर या मंत्रिपदाचा काय उपयोग होईल , असा सूर पालकमंत्री , कृषिमंत्री , सहकारमंत्री आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी शनिवारी ( १५ ऑक्टोबर ) व्यक्त केला . आम्ही सर्वजण मिळून औरंगाबादच्या विकासासाठी प्रयत्न करू , असे आश्वासन पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी दिले . जिल्हा बँकेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ . कराड , कृषिमंत्री अब्दुल सत्तार , सहकारमंत्री अतुल सावे , भुमरेंचा सत्कार झाला . बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील , आमदार सतीश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती . केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे , विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निमंत्रण नसल्याबद्दल भुमरे यांनी खंत व्यक्त केली . विरोधी पक्षनेते आमचेच आहेत , असेही ते म्हणाले विमावाले फक्त 10 टक्के देतात नितीन पाटील म्हणाले की , इन बॅलन्सचा प्रश्न केंद्रीय मंत्री अमित शहा तसेच अन्य मंत्र्यांनी मार्गी लावावा . रामकृष्ण उपसा जलसिंचन योजना पूर्ण करून १५ गावांच्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा . आमदार चव्हाण म्हणाले की , बँकेला अव्वल करण्यासाठी चारही मंत्र्यांनी हातभार लावावा . विमा कंपन्या ११० टक्के भरपाईचा दावा करतात . प्रत्यक्षात त्या १० टक्केच देतात . विमा कंपनीचे बारावी पास कर्मचारी आपल्या आयएएस अधिकाऱ्यांना कळू देत नाहीत . केंद्राने कृषिमंत्र्यांची बैठक घेऊन ठोस निर्णय घ्यावा . अध्यक्षांचा चेहरा उतरला सत्कार समारंभात सत्तार यांचे भाषण सुरू असताना नितीन पाटील , आमदार चव्हाण आपसात बोलत होते . त्यामुळे सत्तार पाटील यांना चिडून म्हणाले , ' मला तुम्हाला आमदार करायचे आहे , पण तुम्हाला ते कळतच नाही . ' त्यावर चव्हाण यांनी ' आतापासून गाजर दाखवायला सुरुवात केली की काय ? ' अशी कोटी केली . मग सत्तार म्हणाले की , पाटील यांना काही कळत नाही . ही समस्याच आहे . आणि ते तुमचे ( चव्हाण ) तुमच्याच पक्षाचे काम करत आहेत . यामुळे पाटील यांचा चेहरा उतरला , तर चव्हाण लगेच निघून गेले .तसेच सावे म्हणाले की , शेतकरी मेळावा आयोजित करून त्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांना मंत्र्यांनी उत्तरे देण्याचे नियोजन करावे . रामकृष्ण जलसिंचन योजनेसाठी मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार प्रयत्न करू . भुमरे म्हणाले की , देवगिरी , गंगापूरचा सहकारी साखर कारखाना सुरू करणे आवश्यक आहे . डॉ . कराड म्हणाले की , जिल्हा बँकेचा इन बॅलन्सचा प्रश्न केंद्र सरकार एकटे सोडवू शकणार नाही . त्यासाठी स्वतंत्र नियोजन करावे लागणार आहे . तसेच रामकृष्ण जलसिंचन योजनेकरिता बैठक घेऊन तोडगा काढू . कागजीपुऱ्यात लवकरच शेतकरी प्रशिक्षण केंद्र सुरू होणार असल्याची घोषणाही त्यांनी केली