रत्नागिरी : जिल्ह्याची वाढती लोकसंख्या, औद्योगीकरण आणि येऊ घातलेल्या नाणार प्रकल्पाचा विचार करता जनतेच्या सुरक्षेसाठी पोलिस दलाचे मनुष्यबळ अपुरे पडत आहे. याचा सारासार विचार करून जनतेच्या सुरक्षेचा विचार करून लोटे (ता. खेड) आणि नाणार (ता. राजापूर) येथे जिल्हा पोलिस दलाची दोन विशेष पोलिस ठाणी विचाराधीन आहेत. पोलिस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला.

जिल्ह्याची लोकसंख्या १६ लाखाच्यावर आहे. त्या तुलनेत जनतेच्या सुरक्षेसाठी पोलिस मनुष्यबळाचा विचार केला तर केवळ १ हजार ५१३ एवढेच आहे. सुमारे अकराशे लोकामागे १ पोलिस अशी गंभीर स्थिती जिल्ह्यात आहे. जिल्ह्यात पोलिस दलात मंजूर असलेल्या १ हजार ७४० पदांपैकी २२७ पदे रिक्त आहेत. त्यामध्ये अधिकाऱ्यांचीच २९ पदे रिक्त असल्याने प्रभारींवर अनेक ठिकाणी कारभार सुरू आहे. यामुळे जनतेच्या सुरक्षिततेचे गणित जुळविताना पोलिस दलाची दमछाक होत आहे. त्यात कोकण रेल्वे, जलमार्ग, महामार्ग आदीचा वापर वाढल्याने गुन्हेगारी अधिक फोफावली. मुंबईसह केरळ, बेळगाव आदी राज्य जिल्ह्याच्या जवळ आली. जिल्हा पोलिस दल गुन्हेगारी थोपविण्यासाठी सक्षम असले तरी लोकसंख्येच्या तुलनेत पोलिस मनुष्यबळ अगदी कमी आहे. जिल्ह्याला मोठा समुद्र किनारा असल्याने समुद्र मार्गे होणारी घुसखोरी रोखण्याची मोठी जबाबदारी तटरक्षक दलाबरोबर कस्टम आणि पोलिसांचीही आहे. दिवसेंदिवस गुन्हे वाढत असून गुन्हेगारीला जरब घालण्यासाठी पोलिस दल अजून सक्षम करण्याची गरज आहे. वाढती गुन्हेगारी कमी करण्यासह सण, उत्सव काळातील बंदोबस्त, आंदोलन, सुरक्षा, अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाया, जिल्ह्यात निघत असलेले विविध मोर्चे यांसह अन्य कारणांसाठी पोलिस मनुष्यबळ द्यावे लागते. एकीकडे कामाचा ताण वाढत असताना जिल्ह्यात पोलिसांची विविध वर्गांची २२७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांची मानसिकता ढासळत आहे.