परभणी(प्रतिनिधी)मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शनिवारी (दि.17) सकाळी 9 वाजता शहरातील वसमत रस्त्यावरील राजगोपालाचारी उद्यानातील हुतात्मा स्मृतीस्तंभासमोर सहकार मंत्री अतुल सावे (औरंगाबाद) यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात येणार आहे.
दोन महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्यात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. त्यात औरंगाबाद येथील भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल सावे यांचा मंत्री म्हणून समावेश करण्यात आला. त्यांच्याकडे सहकार मंत्रिपदाची धुरा देण्यात आली आहे. परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर अजून कोणाचीच वर्णी लागलेली नसल्याने शिंदे - फडणवीस सरकारने अतुल सावे यांच्यावर स्वातंत्र्य दिनी परभणी जिल्ह्याच्या ध्वजारोहणाची जबाबदारी सोपवली होती. आता मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शनिवारी परभणीत अतुल सावे यांच्याच हस्ते ध्वजारोहण होईल. याबाबत शासनाने 14 सप्टेंबर रोजी पत्र काढून ही माहिती दिली आहे.