विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर करून उपस्थितांची मने जिंकली

बीड(प्रतिनिधी):- तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड येथील बी.सी.ए , बी.सी.एस विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक स्नेहसंमेलनाचे आयोजन प्राचार्य डी.जी.निकाळजे यांनी दि.८ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता. तुलसी इंग्लिश स्कूल येथील प्रांगणामध्ये केले होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रदिप रोडे यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून भालचंद्र विद्यालय, लिंबागणेशचे परिवेक्षक पी.डी.मोरे यांची उपस्थिती होती.

सांस्कृतिक कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि नवे कलाकार उदयास यावे यासाठी तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने सांस्कृतिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविकात प्राचार्य डी.जी.निकाळजे यांनी कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान बरोबरच सांस्कृतिक नुकसानही झाल्याचे सांगितले. शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांमध्ये कला गुण असणे महत्त्वाचे आहे. कलेच्या माध्यमातून अनेक कलाकारांनी बीडचे नाव चित्रपट सृष्टी मध्ये गाजवले आहे. बीड जिल्ह्याच्या मातीने अनेक कलाकारांना घडविले आहे.विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच सांस्कृतिक क्षेत्राची नवी ऊर्जा निर्माण व्हावी आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी या सांस्कृतिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे डी.जी.निकाळजे यांनी सांगितले. भालचंद्र विद्यालय लिंबागणेशचे परिवेक्षक पी.डी.मोरे यांनी पाश्चात संस्कृतीपेक्षा भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगत ज्यांच्याकडे फाटके कपडे आहेत ते गरीब लोक पूर्ण अंग झाकण्यासाठी कपड्याच्या शोधात आणि प्रतीक्षेत आहेत.मात्र ज्यांच्याकडे चांगले कपडे परिधान करण्याची ऐपत आहे.त्यांनी फॅशनच्या नावाखाली फाटके कपडे घालण्याची फॅशन सुरू केली आहे. पाश्चात्त्य संस्कृती पेक्षा भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे असे मत मोरे यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणामध्ये संस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे यांनी देवगिरी प्रतिष्ठान बीडच्या माध्यमातून सुरू असलेली सर्व युनिट चांगल्या प्रकारे कामकाज करत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपायोजना आखून त्यांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन प्रा.प्रदीप रोडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिले. तुलसी कॉलेजचे विद्यार्थी,विद्यार्थिनी आंतरराष्ट्रीय पातळीवर बीडचे नाव लौकिक करत असल्याचे प्रा.रोडे यांनी आपल्या भाषणा प्रसंगी बोलताना सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किर्ती पवार,सचिन भरती यांनी केले आणि उपस्थितांचे आभार मानले.