कन्नड : देशाची साधन संपत्ती ही कष्टकरी आदिवासी , शेतकरी , महिलांनी आपल्या रक्त , घामातून निर्माण केली आहे . परंतु , हीच देशाची साधनसंपत्ती केंद्रातील सरकारने भांडवलदारांच्या घशात घालण्याचे काम केले आहे . ती खिरापत म्हणून भांडवलदारांना वाटता येणार नाही . याविरोधात संघटितपणे लढा तीव्र करण्यात येईल , असे मत सत्यशोधक कष्टकरी शेतकरी सभेच्या कार्यकर्त्या होमाबाई गावित यांनी गुरुवारी व्यक्त केले . कन्नड येथे क्रीडा संकुलात सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या नवव्या पंचवार्षिक राज्य अधिवेशनास रामसिंग गावित यांच्या अध्यक्षतेत सुरुवात झाली . या वेळी होमाबाई गावित म्हणाल्या , जल , जमीन , हवा भांडवलदारांच्या घशात घालून या देशाचे मूळ रहिवासी आदिवासी , कष्टकरी शेतकरी विस्थापित करण्यात येत आहेत . या विरोधात तीव्र संघर्ष उभा करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला . तर राज्यसंघटक कॉ . किशोर ढमाले म्हणाले , देशात मनुवादी सरकारआदिवासी वनहक्क कायदे , कामगार कायदे मोडून टाकत आहे . आदिवासी कसत असलेल्या जमिनींवर बुलडोझर फिरवत आहेत . भांडवलदारांना पावणेदोन लाख एकर जमीन फुकटात दिली . स्वातंत्र्याला ७५ वर्षे झालीत , पण आदिवासींना जमिनीचा सातबारा मिळत नाही . आदिवासींच्या मूलभूत न्याय्य हक्कांसाठी एकजुटीने लढ्यासाठी सज्ज व्हा . असे सांगितले . यावेळी स्वागताध्यक्ष डॉ . मिलिंद पाटील , डॉ . सीताराम जाधव , भीमराव बन्सोड , उद्घाटक बाळासाहेब सुरडे , रणजित गावित , राजेंद्र बावके , बद्रीनाथ कतारे , रावजी पथवे , करणसिंग कोकणी , दिलीप गावित , सुदीप कांबळे , आर . टी . गावित , मन्सराम पवार , लीलाताई वळवी , हिलाल महाजन , यशवंत माळचे , राजेंद्र बावके , भाऊसाहेब थोरात आदींचीही भाषणे झालीत . आर . टी . गावित यांनी प्रास्ताविक केले . अश्फाक कुरेशी यांनी सूत्रसंचालन तर संयोजक कॉ . रतन मधे यांनी आभार मानले . या वेळी बाळू मेंगाळ , जयराम पथवे , बुधाभाऊ गावंडे , शेषराव पथवे , विष्णू थोरात , दिनकर दाभाडे , के . एस . जाधव , कुशिनाथ मेंगाळ आदींसह शेतकरी , कष्टकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते