मुंबई: शिवसेना आणि शिंदे गटाचा बहुचर्चित दसरा मेळावा मुंबईत सुरु असतानाच दिल्लीत निवडणूक आयोगाच्या हालचालींना वेग आल्याची माहिती आहे. शिवसेना पक्ष कोणाचा आणि धनुष्यबाण या चिन्हावर कोणाचा हक्क आहे, याबाबतचा निर्णय सध्या निवडणूक आयोगाच्या कोर्टात प्रलंबित आहे. यासंदर्भात पुरावे सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिंदे गटाला 7 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देऊ केली होती. त्यानुसार काल दसरा मेळावा सुरु असताना शिवसेनेचे पदाधिकारी पुरावे घेऊन दिल्लीत निवडणूक आयोागच्या दारात पोहोचले होते. शिवसेनेकडून पुरावे सादर करण्यात आल्यानंतर आता निवडणूक आयोगाकडून येत्या काही तासांमध्ये धनुष्यबाण चिन्हाबाबत महत्त्वाचा निकाल दिला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून आज वकिलांची भेट घेतली जाणार आहे. या बैठकीत निवडणूक आयोगाला काय उत्तर द्यायचे, आणखी कोणत्या प्रकारचे पुरावे सादर केले पाहिजेत, याबाबत खल होऊ शकतो. या सगळ्या कायदेशीर लढाईसाठी आणखी काही अवधी मिळावा अशी शिवसेनेची एकंदर भूमिका आहे. मात्र, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्याने निवडणूक आयोगाच्या हालचालींना वेग आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे येत्या काही तासांमध्ये म्हणजे साधारण शुक्रवारी निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण चिन्हाबाबत महत्त्वाचा निकाल दिला जाऊ शकतो. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याकडे शिवसेना आणि शिंदे गटाच्या नजरा लागल्या आहेत.