रत्नागिरी : पुण्याहून पावस परिसरात फिरण्यासाठी आलेल्या चार मित्रांपैकी एकजण रविवारी सकाळी 11.30 वा. गावखडी समुद्रात बुडाला. त्याचा शोध घेण्यात येत होता. मात्र त्याचा मृतदेह सापडला आहे. आकाश पांडुरंग सुतार (28) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

पुणे येथून प्रशांत जालिंदर काळे, आकाश पांडुरंग सुतार, राजकुमार शेषराव पिटले, कृष्णा ज्ञानोबा येडीलवाड हे चौघे मित्र सुट्टी असल्याने फिरण्यासाठी आले होते. रविवारी सकाळी 11 वा. गावखडी समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले होते. समुद्रकिनाऱ्यावर फिरताना आकाश सुतार समुद्रात पोहण्यासाठी गेला. त्यावेळी त्याच्याबरोबर असलेले तिघेजण पोहता येत नसल्याने समुद्रकिनारी बसून राहिले होते. पाण्याचा जोर वाढल्याने आकाश गटांगळ्या खाऊन बुडत असल्याचे त्याच्या मित्रांच्या लक्षात आले. यावेळी राजकुमार पिटले याने समुद्राच्या पाण्यात उतरण्याचा प्रयत्न केला. परंतु आकाश दिसून आला नाही. त्यामुळे त्यांनी तातडीने जवळच असलेल्या एका दुकानदाराला माहिती देऊन पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याशी संपर्क केला. त्यानंतर तातडीने पोलीस अंमलदार व ग्रामस्थ यांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र रात्री उशिरापर्यंत आकाशचा शोध लागला नव्हता. अखेर आज त्याचा मृतदेह आढळून आला.