परभणी,दि.2(प्रतिनिधी): जिल्ह्यातील एकुण 85% जमीन ही लागवडीसाठी योग्य असून येथील माती सुपिक व मुबलक पाणी उपलब्ध असल्याने जिल्ह्यात 60% शेतकरी हे पारंपारिक पध्दतीने शेती करतात. त्यामुळे जिल्ह्यातील शेतक-यांचे सरासरी उत्पन्न हे एक लाख पेक्षा कमी असल्याचे दिसुन येते.
आजादी का अमृत महोत्सव व सेवा पंधरवड्यानिमित्त जिल्ह्यात वृक्षारोपण मोहिम राबविल्यास, समृध्द गावाची संकल्पना प्रत्यक्षात येऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होईल. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड,वृक्षलागवड फुलपिक लागवड कार्यक्रम राबविणे शक्य आहे.
फळपिक लागवड, वृक्ष लागवड ही हमखास शेतक-यांना उत्पन्न देणारी पिके आहेत. त्यामुळे शेतक-यांना शाश्वत उत्पन्नाची हमी मिळणे तसेच शेतकरी स्वतः जॉबकार्ड धारक असल्यामुळे किमान 100 दिवसांचा रोजगार स्वतःच्याच शेतावर काम करून मिळवू शकतो. तसेच स्वतःच मग्रारोहयो अंतर्गत स्वतःच्या फळपिकांसाठी काम करत असल्यामुळे फळ, वृक्ष पिकांची काळजी चांगल्या प्रकारे घेतली जाऊ शकते. त्याचबरोबर त्याचा बेरोजगारीचा प्रश्न सुटून फळ, वृक्ष पिकाच्या लागवडीने शाश्वत उत्पन्न वाढ होऊन शेतकरी हा लखपती होऊन समृध्दी बजेटची संकल्पना पुर्णत्वाकडे नेण्यास मदत होणार आहे. या योजनेत जवळपास 59 प्रकारची फळ, वृक्ष पीके, 16 प्रकारची औषधी वनस्पती लावगड, 4 प्रकारची फुलझाडे आणि 4 प्रकारची मसाला पदार्थाची उत्पन्न शेतकरी घेऊ शकतो. ज्यामुळे बाजारभिमुख शेती (Market Oriented Agriculture) करुन ज्या मालाला बाजारपेठेत चांगला व शाश्वत असा भाव आहे अशी शेती केली जाऊ शकते. त्यामुळे उत्पन्न निश्चिती होऊन शेतक-यांचा एकंदर आर्थिक विकास होऊन आर्थिक सुबत्ता येण्यास निश्चितपणे मदत होऊ शकते. यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनाअंतर्गत दि. 13 एप्रिल, 2022 रोजी वृक्ष, फळबाग लागवड संदर्भात या कार्यालयाने एक परिपत्रक देखील निर्गमित केलेले आहे. त्यानुसार या योजनेचे संनियंत्रने व अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी प्रत्येक गावासाठी एक ग्रामस्तरीय पालक अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यामध्ये ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. परभणी जिल्हयामध्ये एकूण 704 ग्रामपंचायती असून 848 गावांची संख्या आहे. प्रत्येक गावामध्ये किमान 25 हेक्टरवर फळ, वृक्ष, फुलपिके, मसालापीके लागवड करण्याचे उद्दीष्ट प्रत्येक ग्रामस्तरीय पालक अधिकारी यांना देण्यात आलेले होते.
त्यानुसार जुलै 2022 मध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये वृक्ष, फळ, फुल, मसाला पीके लागवडीची मोहिम सुरु करण्यात आलेली आहे. या मोहिम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी दि. 3 ते 7 ऑक्टोबर, 2022 या कालावधीमध्ये फळबाग, वृक्ष लागवडीचे कार्यारंभ आदेश देण्यासाठी संबंधीत तालुक्याच्या पंचायत समिती, तालुका कृषि अधिकारी कार्यालय व वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय (सामाजिक वनीकरण) स्तरावर कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे.
ज्या शेतक-यांनी ग्रामपालक अधिकारी यांचेकडे फळ, वृक्ष लागवडसाठी अर्ज दिलेला असेल व अद्यापपर्यंत फळ, वृक्ष लागवड कामाचे कार्यारंभ आदेश प्राप्त झाले नसल्यास संबंधित तालुक्यातील पंचायत समिती कार्यालय, तालुका कृषि अधिकारी कार्यालय अथवा वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय स्तरावर उपरोक्त दिनांक दरम्यान संपर्क साधावा व कार्यारंभ आदेश प्राप्त करुन घेण्याचे सर्व संबंधीत शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे.
तसेच अद्यापपर्यंत ज्या शेतक-यांनी फळबाग, वृक्ष लागवड करण्यासाठी अर्ज केलेला नसेल अशा शेतक-यांनी संबंधीत ग्राम पालक अधिकारी यांचेकडे फळ, वृक्षलागवड मोहिमेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ अर्ज (अर्ज प्रपत्र अ, ब मध्ये) सादर करावा. त्यासाठी केवळ संबंधित जमीनीचा 7/12 व जॉब कार्ड या कागदपत्रांची आवश्यकता आहे.
जिल्ह्यातील सर्व शेतकरी, शेतक-यांसाठी काम करणा-या सर्व समाजसेवी संघटना यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.