राज्य उत्पादन शुल्क खात्याने संपूर्ण जिल्ह्यात अवैध दारू विरोधात मोहीम राबवून मुळेगाव तांडा, दोड्डी तांडा (ता. दक्षिण सोलापूर) पंढरपूर, करमाळा, माळशिरस येथून 3 वाहनासह एकूण 3 लाख 41 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. सदर प्रकरणात एकूण 15 गुन्हे दाखल करण्यात आले असून 11 आरोपीना अटक करण्यात आली आहे. निरीक्षक ब विभाग सदानंद मस्करे व दुय्यम निरीक्षक अंकुश अवताडे यांच्या पथकाने दोड्डी तांडा, व वडजी तांडा येथे 280 लीटर हातभट्टी दारू व 2150 लिटर रसायन असा एकूण 65200 रू. मुद्देमाल जप्त करून रमेश चव्हाण रा. सिताराम तांडा. लालसिंग राठोड व लिंबाजी जाधव दोघे रा. दोड्डी तांडा या आरोपीना अटक केली.
पंढरपूर निरीक्षक मुळे व दुय्यम निरीक्षक पाटील आणि दु.नि. शेख यांच्या पथकाने करमाळा व पंढरपूर येथे एकूण 5 गुन्हे नोंद करत अरुण माने रा. जेऊर करमाळा, विक्रम कदम, रा. जेऊर करमाळा व महादेव माळी , पंढरपूर या आरोपीना अटक करत 15 लीटर हातभट्टी दारू, 700 लि. रसायन व एक वाहनासह एकूण 70960 रू. मुद्देमाल जप्त केला.
निरीक्षक सुनिल कदम यांच्या भरारी पथकाने दोड्डी तांडा व मुळेगाव तांडा येथे एकूण दोन गुन्हे नोंद करून एक आरोपी नामे कविता जाधव रा. मुळेगाव तांडा हीला अटक करून रसायनासह एकूण 92300 रू. मुद्देमाल जप्त केला.
निरीक्षक अ विभाग संभाजी फडतरे व दुय्यम निरीक्षक देशमुख व दुय्यम निरीक्षक उषाकिरण मिसाळ यांच्या पथकाने सोलापूर शहरातील मार्केट यार्ड येथे एक दुचाकी वाहनासह 140 लिटर हातभट्टी दारू असा एकूण 78780 रू. मुद्देमाल जप्त केला.
निरीक्षक माळशिरस श्री. कदम यांच्या पथकाने कमलापुर ता. सांगोला येथे 17 लिटर देशी दारू सह एक वाहन असा एकूण 33760 रू. मुद्देमाल जप्त करून शैलेश माने रा. गुणपवाडी सांगोला व
सातप्पा शिंदे रा. कमलापुर सांगोला या आरोपींना अटक केली.
सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्याचे आयुक्त कांतीलाल उमाप , संचालक (अंमलबजावणी व दक्षता) सुनिल चव्हाण, विभागीय उपआयुक्त पुणे विभाग अनिल चासकर व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितीन धार्मिक ह्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी ह्यांनी पार पाडली.
राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाकडून विशेष पथके नेमण्यात आली असून अवैध दारू / ताडी विक्री, निर्मिती, वाहतूकीवर सातत्याने कारवाया केल्या जात आहेत. तसेच सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारू/ ताडी निर्मिती /वाहतूक /विक्री /साठा, बनावट दारू, परराज्यातील दारू याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा.