सोलापूर - युवा सेना, संभाजी ब्रिगेड आणि सुटा संघटनेच्या उमेदवार उषाताई पवार यांनी सोलापूर विद्यापीठाच्या निवडणुकीत विजय संपादन केल्याबद्दल युवा सेनेच्यावतीने पार्क चौकातील कार्यालयासमोर शनिवारी जल्लोष करण्यात आला .युवा सेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले, सचिन बागल आणि गणेश इंगळे तसेच विजयी उमेदवार उषा नंदकुमार पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या जल्लोषप्रसंगी गुलालाची उधळण करण्यात आली. विजयी उमेदवार उषा पवार यांना पेढे भरविण्यात आले.व जल्लोष करण्यात आला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आणि वरूण सरदेसाई यांचा विजय असो, शिवसेना जिंदाबाद ,युवासेना जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या.

युवा सेनेच्या माध्यमातून उषाताई पवार यांनी सोलापूर विद्यापीठामध्ये प्रवेश केला असून निश्चितच आता विद्यार्थ्यांच्या हिताच्या निर्णयासाठी ते आपली बाजू भक्कमपणे मांडतील, असा विश्वास युवा सेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले यांनी व्यक्त केला .तसेच संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत यांनीसुद्धा युवा सेना, संभाजी ब्रिगेड आणि सुटाच्या माध्यमातून लढविलेल्या निवडणुकीत उषाताई पवार या भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. आपण यापूर्वी मतदार म्हणून उमेदवारांना मतदान केले होते. तोच अनुभव आपल्या पाठीशी होता आणि आता उमेदवार म्हणून आपण निवडणुकीत उभे असल्यामुळे आणि मतदारांकडे जाताना नेमके कोणते विषय घेऊन जायचे याची माहिती आपल्याला असल्यामुळे तसेच आगामी काळात विद्यार्थ्यांसाठी भरीव काम करायची मनात इच्छा असल्यामुळेच आपण निवडणुकीत उडी घेतली आणि विजय संपादन केला असल्याचे युवा सेनेच्या विजयी उमेदवार उषा पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

याप्रसंगी लहू गायकवाड, स्वप्निल वाघमारे, किशोर देशमुख, महेश भोसले, राहुल गंधुरे, किरण भांगे, राम कांबळे, ऋषिकेश धाराशिवकर ,लखन शिंदे, प्रसाद निळ, तुषार आवताडे, प्रथमेश तपासे ,अथर्व चौगुले, विक्रम भोसले, अभिषेक सूळ यांच्यासह बबिता काळे तसेच युवा सेनेचे अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.