रत्नागिरी : पावसाने परतीचा मार्ग स्विकारला असून शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळी रत्नागिरीत विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार सर कोसळली. अचानक सुरु झालेल्या पावसाने सायंकाळी कार्यालयीन कामकाज आटपून परतणाऱ्यांची तारांबळ उडाली होती. तसेच राजापूर, संगमेश्वर, चिपळूण, लांजा तालुक्यातही हलका पाऊस झाला आहे. जिल्ह्यात शनिवारपर्यंत हलका व मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाकडुन वर्तवली आहे.
राज्यात परतीचा पाऊस सुरु झाला आहे. मागील आठवड्यात दिवसभर कडकडीत उन आणि सायंकाळी हलकी एखादी पावसाची सर असे वातावरण आहे. काही तालुक्यात तर निरंक नोंद आहे. शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोविस तासात जिल्ह्यात सरासरी ३.६७ मिमी पाऊस झाला. त्यात दापोली १, खेड ५, संगमेश्वर २३, राजापूर ४ मिमी नोंद झाली. १ जुनपासून आजपर्यंत ३,४५३ मिमी सरासरी पाऊस झाला. तर गतवर्षी याच कालावधीत ४ हजार २०८ मिमी पाऊस झाला होता. तुलनेत ८०० मिमी कमी पावसाची नोंद झाली आहे.