प्रशासकीय यंत्रणा दिव्यांगांच्या मदतीसाठी सदैव तत्पर... अमित शेडगे प्रांताधिकारी श्रीवर्धन 

 दिव्यांग बांधव समाजातील एक महत्त्वाचा घटक आहे. दिव्यांग बांधवांच्या अडीअडचणीचे निराकरण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सदैव तत्पर आहे असे प्रतिपादन प्रांत अधिकारी अमित शेडगे यांनी केले आहे . उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन येथे दिव्यांग अस्मिता कार्यक्रमांतर्गत श्रीवर्धन तालुक्यातील दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी प्रांताधिकारी अमित शेडगे म्हणाले श्रीवर्धन तालुक्यातील दिव्यांगांची संघटना अतिशय उच्च दर्जाची कामगिरी बजावत आहे. आपल्या तालुक्यातील बांधवांना प्रमाणपत्रासाठी अलिबाग या ठिकाणी जावं लागत होतं. मात्र संघटनेच्या प्रयत्नाने डॉक्टरांच्या सहकार्याने आपण आपल्या बांधवांना श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात प्रमाणपत्राचे वितरण करत आहोत . दिव्यांग बांधवांच्या समस्यांचे निराकारण करण्याच्या हेतूने शासनाने विविध उपक्रमाची सुरुवात केली आहे रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यात सर्वत्र विविध उपक्रम तसेच शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे दिव्यांग घटकासाठी राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा सर्वांनी उपयोग करून घ्यावा. प्रशासन दिव्यांग बांधवांच्या सोबत आहे असे अमित शेडगे यांनी सांगितले. सदरच्या शिबिरासाठी प्रांताधिकारी अमित शेडगे यांच्या समवेत तहसीलदार सचिन गोसावी , उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. गौतम देसाई, डॉ. शुभम शेळके, डॉ. प्रतिभा फडतरे , दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष निलेश नाक्ती, भरत पवार, मुईद सरखोत, संतोष पारधी तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.