बीड (प्रतिनिधी)- गेल्या तीन ते चार दिवसांपासून भगरीमधून विषबाधा झाल्याचे प्रकार बीड जिल्ह्यात घडले आहे. या अगोदरही असे प्रकार घडले होते परंतू याकडे बीड मधील अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष होत आहे कारण त्यांचे हात भ्रष्टाचारामध्ये बरबटले असल्याचा आरोप करत जनतेच्या जिवीतांशी खेळणार्या भेसळ माफियांवर कडक कायदेशीर कारवाई करा अशा मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष जीवन घोलप यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे कॅबिनेट मंत्री संजय राठोड, विशेष कार्य अधिकारी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष मंत्रालय मुंबई यांच्याकडे जिल्हाधिकारी बीड यांच्या माध्यमातून शासन दरबारी मागणी केली आहे.
पुढे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड मधील अन्न आणि औषध प्रशासन विभाग भ्रष्टाचारामध्ये बरबटल्याप्रमाणे नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. हा काही एकमेव प्रकार नसून बीड जिल्ह्यामध्ये अनेक खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते. बीड जिल्ह्यात दुधामध्ये भेसळ करून दूध व दुग्धजन्य पदार्थ बनवले जातात, तेलामध्ये भेसळ करून पाम तेल मिसळून विविध कंपन्यांचे बनावट तेल वितरित केले जाते, राशनच्या धान्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होतो, डाळींची साठेबाजी करून जनतेस वेठीस धरले जाते आणि भेसळयुक्त डाळी वितरित केल्या जातात, गुटखा माफीयांशी संगनमत करून सर्रासपणे गुटख्याची विक्री होत आहे. ही बाब साधी नसून गंभीर स्वरूपाची आहे जनतेच्या आरोग्याची हमी आणि जबाबदारी ही शासनाची असल्यामुळे प्रशासनाने कडक कारवाई करून हे सगळे प्रकार थांबवणे अपेक्षित आहे परंतु प्रशासनातील अधिकार्यांची गुटखा माफीयांची, राशन माफियांशी व अन्न भेसळ माफीयांशी मिली भगत असल्याने भेसळ करणार्यांवर, सर्वसामान्य नागरिकांचे जीविताशी खेळणार्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसून येत नाही. अनेक वर्तमानपत्रातून यावर ताशेरे ओढलेले असून बातम्या छापून आलेल्या असतानाही सदरील प्रकार सुरूच आहेत हे केवळ निंदनीयच नव्हे तर क्लेशकारक आहे. म्हणून, याकडे महाराष्ट्र राज्य सरकारने आणि दस्तूर खुद्द जिल्हाधिकारी साहेबांनी विशेष लक्ष देऊन नागरिकांच्या जीविताची खेळण्याचे सदरील प्रकार बंद करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अथवा जनतेच्या न्याय हक्कासाठी बीड जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडले जाईल असा इशारा जीवन घोलप, राहुल वायकर (विभागीय अध्यक्ष संभाजी ब्रिगेड), अरबाज शेख (जिल्हा उपाध्यक्ष), प्रशांत शेळके, अजय लांडगे, महेंद्र मोरे (जिल्हाध्यक्ष), राहुल डावकर (तालुका अध्यक्ष), महेश नेवडे इत्यादींनी दिला आहे.