चिपळूण : तालुक्यातील कळवंडे येथील अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या त्या महिलेचा मृतदेह चोवीस तास उलटून गेले तरी कामथे येथील शवागृहात आहे. हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप स्थानीक काही ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली. तीस तासाहून अधिक काळ मृतदेहावर अंत्यसंस्कार झालेले नव्हते. 

गुरूवारी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास रिक्षा आणि झायलो कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात आशा रविंद्र वरपे (४५) यांचा या मृत्यू झाला. तसेच त्यांचे पती रिक्षा चालक रविंद्र नारायण वरपे (रा. दोघेही कळवंडे वरपेवाडी) हे गंभीर जखमी झाले. तर झायलो चालक नंदेश सदाशीव वरपे हे जबर जखमी झाले आहेत. कळवंडे वरपेवाडी येथील रविंद्र वरपे हे पत्नीसह रिक्षाने जात असताना समोरून येणाऱ्या झायलो गाडीची रिक्षाला धडक बसली. यामध्ये रिक्षा दूरवर फेकली गेली. या घटनेत आशा वरपे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना कामथे उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, हा अपघात नसून घातपात आहे. गणेशोत्सवापासून या कुटुंबामध्ये वाद सुरू होता. या वादातून हा घातपात झाल्याचा संशय काही ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या प्रकरणी घातपाताचा गुन्हा दाखल करावा व संबंधितांना अटक करावी अशी ठाम भूमिका येथील ग्रामस्थांनी घेतली.