राजापूर : येथील राजापूर तालुका जनकल्याण पतसंस्थेच्या १७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना नऊ टक्के लाभांश देण्याचे निश्चित करण्यात आले. राजापूर हायस्कूलच्या कलामंदिर सभागृहात अध्यक्ष हरिश्चंद्र शिवगण यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली.

या वेळी अहवाल वर्षात पतसंस्थेने केलेल्या कामगिरीबद्दल उपस्थित सभासदांनी पतसंस्थेच्या संचालक मंडळ व कर्मचारी वृंदाचे कौतुक केले, तर सभासदांनी मांडलेल्या विधायक सूचनांची अंमलबजावणी करून सभासदाभिमुख कारभाराची हमी व्यासपिठावरून देण्यात आली. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करण्यात आले. त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. ३१ मार्च २२ अखेरच्या वार्षिक अहवाल, नफा-तोटा पत्रक, ताळेबंदपत्रक तसेच लेखापरीक्षण अहवाल दोष दुरूस्तीची नोंद घेण्यात आली. यावेळी सभासदांतून आलेल्या शंका व सूचनांचे निरसन अध्यक्ष हरिश्चंद्र शिवगण व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश हातणकर यांनी केले. या वेळी मोहन पाडावे, संतोष हातणकर, प्रकाश शिंदे यांच्यासहित मोठ्या संख्येने सभासद, संचालक कर्मचारी उपस्थित होते.