सोलापूर- जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे विणले आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गामुळे लाखो भाविक जिल्ह्यात येतात. सुरत-चेन्नई ग्रीन कॉरिडॉर होणार असल्याने आणखी शहराशी आपण जोडले जाणार आहोत. शिवाय पंढरपूर, अक्कलकोट हे धार्मिक पर्यटन जिल्ह्यात असल्याने पर्यटनाला पोषक वातावरण तयार होत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.
जागतिक वन दिनानिमित्त वन विभाग, सोलापूर सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने सिद्धेश्वर वन विहार येथे आयोजित पर्यटन परिसंवादात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी माजी मंत्री, सोलापूर सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष, आमदार सुभाष देशमुख, सहायक वनसंरक्षक बाबा हाके, सोशल फाऊंडेशनच्या संचालिका मयुरी शिवगुंडे यांच्यासह पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ, पर्यावरण तज्ज्ञ उपस्थित होते.
श्री. शंभरकर यांनी सांगितले की, सोलापूरच्या विकासासाठी प्रत्येक नागरिक जागरूक आहे. जिल्ह्याची बलस्थाने शोधून पर्यटनावर भर द्यावा. पर्यटनासाठी ठिकाण, सोयी-सुविधा आणि पर्यटक लागतात, ते जिल्ह्यात आहे. रस्त्यांचे जाळे आहे. यामुळे पर्यटकांचा वेळ वाचला असून लाखो पर्यटक जिल्ह्यात येत आहेत. उजनी धरण, हिप्परगा तलाव याठिकाणीही पर्यटनाला वाव आहे. शिवाय पर्यटन आणि मनोरंजनाकडे नागरिकांचा कल वाढला आहे. पर्यटकांना पर्यटनाची माहिती होण्यासाठी मोबाईल ॲप उपयुक्त आहे. गावाच्या विकासाला लोकसहभाग महत्वाचा असल्याचेही त्यांनी सांगितले.
*रेनगर परिसरात रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न*
रेनगर परिसरात 30 हजार घरांची गृहनिर्माण सोसायटी तयार होत आहे. यामुळे या परिसरात दीड ते दोन लाख नागरिक वास्तव्याला असणार आहेत. त्यांच्या रोजगारांचा प्रश्न निर्माण होऊ यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून रोजगारन निर्मितीसाठी प्रयत्न करणार आहे. गारमेंट उद्योगासाठी त्यांच्यासोबत बैठक घेणार असल्याचेही श्री. शंभरकर यांनी स्पष्ट केले.
*माळढोक जिल्ह्याचे सौंदर्य*
नान्नज अभयारण्यामध्ये माळढोक पक्षी आहे. जिल्ह्याचे सौंदर्य वाढविण्याचे काम माळढोक करीत आहे. याठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येण्यासाठीही प्रयत्न केले जातील, जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर, शहरातील प्रवेशद्वारावर माळढोकबाबतचे फलक, घोषवाक्य लावण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
*आदर्श गाव, शाळा करण्याचा प्रयत्न करा-सुभाष देशमुख*
आमदार श्री. देशमुख म्हणाले, निसर्गाने प्रत्येक गावाला नैसर्गिकरित्या वेगळ बनविले आहे. याचा फायदा घेऊन गावाचा विकास करावा. प्रत्येक गावच्या लोकप्रतिनिधींनी आदर्श गाव आणि शाळा होण्यासाठी प्रयत्न करावेत. गावे समृद्ध होण्यासाठी लोकसहभाग वाढवून झाडांची स्पर्धा घेतली तर गावांचा विकास होण्यास मदत होईल.
जिल्ह्यात धार्मिक ठिकाणे आहेत, धार्मिक पर्यटन कसे करावे, धार्मिक हब निर्माण होण्यासाठी शासनाला प्रस्ताव द्यावा. जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणी शोधून त्यांची माहिती काढायला हवी. शाळांच्या सहली सिद्धेश्वर वनविहार किंवा अन्य ठिकाणी नेण्यासाठी शाळांनी पुढाकार घ्यावा, आपणच आपल्या जिल्ह्याचे मार्केटिंग करायला हवे.
*हुरड्याचे आगार बनवा*
जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हटले जाते. हुरडा हा जिल्ह्यातील पार्टी करण्याची पद्धत होऊ लागला आहे. यामुळे हुरड्यातून हजारो रूपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. यासाठी त्यांचे मनपरिवर्तन करून शेतकऱ्यांनी हुरड्याचे आगार बनवावे. हुरड्यातूनही पर्यटन होणार असल्याने याकडे शेतकऱ्यांनी सकारात्मक पाहण्याचे आवाहनही श्री. देशमुख यांनी केले.
रेनगरमध्ये घरासोबत रोजगारासाठी शासनाने पावले उचलावीत. 100 एकर जागा याठिकाणी उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली.
*एका क्लिकवर माहिती*
पर्यटकांना जिल्ह्यातील माहिती मिळण्यासाठी कोणतीही अधिकृत साधने नव्हती, सोलापूर सोशल फाऊंडेशने यासाठी मोबाईल ॲप तयार केले आहे. एसएसएफ टुरिझम या नावाने मोबाईल ॲप तयार करण्यात आले आहे. एका क्लिकवर पर्यटकांना जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळे, पर्यटनस्थळे यांची माहिती मिळणार आहे, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.
परिसंवादात नागेश कोकरे, रफिक नदाफ, प्रकाश पवार, पंकज चिंदरकर, रेश्मा माने यांनी जिल्ह्याच्या पर्यटनावर प्रकाश टाकला. पर्यटनवाढीसाठी काय करायला हवे, याविषयी माहिती, सूचना मांडल्या. सूत्रसंचालन वनरक्षक यशोदा आदलिंगे यांनी केले तर आभार विजय कुचेकर यांनी मानले.