प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित माळशिरस या संस्थेच्या वतीने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार 2022 माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील भवानीनगर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक मारुती कसबे यांना नुकताच प्रदान करण्यात आला.

 संस्थेचे माजी चेअरमन हरिभाऊ खरात यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन दत्तात्रय चव्हाण, मदिना तांबोळी, माजी चेअरमन विठ्ठलराव काळे, नितीन बनकर, नवनाथ क्षीरसागर, प्रदीप आवताडे, तात्यासो करनवर, बाबा धोत्रे यांच्यासह शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.

 मारुती कसबे यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल माळशिरस तालुक्यातून अभिनंदन होत आहे. वस्ती शाळेवर विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, गोर गरीब व शिक्षणापासून कोसो दूर असणाऱ्या परिवारातील बालकांना शिक्षणाची आवड लागावी व त्यांनी शिक्षण घ्यावे यासाठी वेळापूर परिसरातील वाड्या वस्त्यांवरील नागरिकांशी वारंवार संपर्कात राहून त्यांचे मत परिवर्तन करून त्या मुलांना शाळेत दाखल करून त्यांना शिक्षण देण्याचे कार्य कसबे गुरुजी हे गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत. 

वेळापूर येथील चव्हाणवाडी व परिसरातील अनेक मुलांना त्यांनी घडवले असून हातभट्टी, भांडी विक्री साठी कायम फिरतीवर असणाऱ्या अनेक परिवारातील बालकांना त्यांनी शाळेची आवड व गोडी निर्माण केली आहे.