सोलापूर - बहुचर्चित सूरत-चेन्नई ग्रीन कॉरिडार महामार्गासाठी जमिनी दिलेल्या बाधित शेतकर्‍यांना ऑक्टोबर महिन्यापासून टप्प्याटप्प्याने मोबदला वाटप करण्यात येणार असून डिसेंबरअखेर भूसंपादनाची संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जाईल, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.

सूरत-चेन्नई ग्रीन कॉरिडॉर महामार्ग हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे संपादन करण्याची मोहीम सध्या सुरू आहे. भूसंपादनासाठी आवश्यक असलेल्या प्राथमिक बाबींची पूर्तता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली आहे. जिल्ह्यातील बार्शी, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट या तीन तालुक्यांतून हा महामार्ग जाणार आहे. त्याची लांबी सुमारे 154 किलोमीटर इतकी आहे. तीन तालुक्यातील 35 गावांतून हा महामार्ग जात आहे. त्यासाठी 936 शेती गटातील 642.12 हेक्टर जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. बाधित शेतकर्‍यांना पहिल्या टप्प्यात बार्शी तालुक्यातील 12 गावांतून वाटप सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने सर्वच बाधितांना मोबदल्याचे वाटप केले जाणार आहे.

जिल्हा प्रशासन व भूसंपादन विभागाच्यावतीने जमीन संपादनाची प्रक्रिया वेगाने राबविली जात आहे. पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील काही गावातील भूसंपादन राहिले होते. तेही काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.

दरम्यान संपूर्ण भूसंपादनाची प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. जानेवारी 2023 मध्ये बाधित सर्व शेतकर्‍यांना त्याचा मोबदला मिळणार आहे.