सोलापूर - बालविवाह निर्मुलन हा बाल मृत्यू आणि माता मृत्यू रोखण्यासाठी महत्वाचा घटक असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले. 

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात प्राथमिक शिक्षण विभाग व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह निर्मुलन प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा (TOT) आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी सीईओ स्वामी बोलत होते. यावेळी शिक्षणाधिकारी किरण लोहार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर, सुधा साळुंखे, निशित कुमार संस्थापक अध्यक्ष SBC 3,पूजा यादव कार्यक्रम प्रमुख,विकास कांबळ, जिल्हा समन्वयक (सोलापूर व लातूर),नंदू जाधव (जिल्हा समन्वयक धुळे व जलगाव),जिल्हा महिला व बाल विकास विभाग UNICEF, SBC 3, व प्रशिक्षणार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

बालमृत्यू आणि मातामृत्यू ही मोठी समस्या असून या समस्येचे प्रमुख कारण बालविवाह असल्याचे सांगून सीईओ स्वामी म्हणाले, बालवयात लग्न झालेल्या मुलींचे गर्भाशय विकसित झालेले नसल्याने तीच्या पोटी जन्माला येणाऱ्या बाळाचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. सोलापूर जिल्हा परिषदेने या अगोदरच *जिवनाची हमी बालमृत्यू कमी* हे अभियान सुरू केले आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात या अभियानाचे चांगले काम सुरू आहे. तसेच नुकतेच दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने *माता सुरक्षित तर घर सुरक्षित* हे अभियान जाहीर केले आहे. 

कोविड काळातही सोलापूर जिल्हा परिषदेने *माझे मुल माझी जबाबदारी* या उपक्रमाची अंमलबजावणी करुन कित्येक दुर्धर आजाराने ग्रस्त मुलांचा शोध घेतला व योग्य वेळी त्यांच्यावर उपचार करून त्या बालकांना जिवदान दिले आहे.

या सर्व अभियानाच्या पार्श्वभूमीवर बालविवाह निर्मुलन प्रशिक्षण युनिसेफ व प्राथमिक शिक्षण विभागाने आयोजित केले त्यामुळे या दोन्ही अभियानास पुरक असा हा उपक्रम असून युनिसेफ आणि प्राथमिक शिक्षण विभागाचे मी अभिनंदन करत असल्याचे सांगितले. प्रशिक्षण घेऊन प्रशिक्षक जिल्हाभरात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करतील व सोलापूर जिल्ह्यात लवकरच बालविवाह निर्मुलन होईल. यावेळी सर्वांना बालविवाह निर्मुलनाची शपथ देण्यात आली.

या प्रशिक्षणात परिचय, प्रशिक्षण प्रवाह, महाराष्ट्रातील बाल विवाहाची स्थिती किती, कुठे व परिणाम, बाल विवाहाच्या विविध स्तरावर काय करायचे ? सक्षम नियोजन, बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम २००६, बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५, बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम व बाल न्याय अधिनियम यांची सांगड, बालविवाहाची नोंदणी, बाल विवाह पूर्व, बाल विवाह घडत असताना, बाल विवाह झाल्यानंतर माहिती, सक्षम - बाल विवाह निर्मूलन प्रशिक्षण अहवाल आदी मुद्दयांवर चर्चा करणेत आली. 

“सायकली” मुळे तीन हजार मुली शाळेकडे वळल्या - सिईओ स्वामी

सोलापूर जिल्हा परिषदेचा

 *सायकल बॅंक* उपक्रमही बालविवाह निर्मुलनामध्ये उपयोगी ठरत आहे. केवळ सायकल नसल्यामुळे मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण वाढत चालले होते. मुलींनी शाळा सोडल्यानंतर त्यामधील काहींचे बालविवाह झाल्याची धक्कादायक माहिती समजली. हे थांबविण्यासाठी लोकसहभागातून मुलींसाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत सायकल बॅंक स्थापन करण्यात आली. आजपर्यंत सुमारे तीन हजार सायकली लोकसहभागातून जमा झाल्या असून तीन हजार मुली शिक्षणाकडे पुन्हा वळल्या असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. मुलींच्या शिक्षणासाठी समाजातील सर्व स्तरातील लोकांनी पुढे यावे असे आवाहन केले.