पंजाब: मोहाली येथील चंदीगड विद्यापीठात एका विद्यार्थिनीने सामूहिक बाथरुममध्ये इतर विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह व्हिडीओ शूट केल्याची बाब समोर आल्यानंतर शेकडो विद्यार्थिंनींनी विद्यापीठ परिसरात जोरदार आंदोलन केलं होत.या प्रकारानंतर विद्यापीठ प्रशासनानं एक निवेदन जारी करत म्हटलं की, केवळ एकच आक्षेपार्ह व्हिडीओ लीक झाला असुन आरोपी तरुणीनं स्वत:चा वैयक्तिक व्हिडीओ शिमल्यातील आपल्या प्रियकराला पाठवला आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या दाव्यानंतर हा खुलासा समोर आला आहे. विद्यार्थिंनींचे आक्षेपार्ह व्हिडीओ लीक प्रकरण सध्या जोरदार चर्चेत असुन याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणीसह अन्य दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
चंदीगड विद्यापीठात असलेल्या सामूहिक स्वच्छतागृहामध्ये आरोपी विद्यार्थिनीने इतर विद्यार्थिनींचे अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केल्याच्या आरोपावरून चंदीगड विद्यापीठाच्या परिसरात शेकडो मुलींनी एकत्र एक आंदोलन केलं. त्यानंतर सोमवारी पोलिसांनी एका तरुणीसह दोन तरुणांना अटक केली आहे. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केलं असता, त्यांना आठवडाभर पोलीस कोठडी सुनावण्यात आली असुन याप्रकरणी आरोपी तरुणीच्या वकिलांनी न्यायालयात झाले आरोपी तरुणीने इतरही विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह व्हिडीओ शूट केल्याची कबुली दिली आहे. याबाबतचं वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिलं आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
चंदीगड विद्यापीठातील वसतीगृहात राहणाऱ्या काही विद्यार्थिनींचे खासगी व्हिडीओ लीक झाले आहेत. या घटनेनंतर विद्यापीठात एकच खळबळ उडाली असून विद्यापीठातील विद्यार्थी-विद्यार्थिनी रस्त्यावर उतरले आहेत. वसतीगृहात राहणाऱ्या एका मुलीनेच आपल्या मैत्रिणींचे व्हिडीओ लीक केले आहेत. व्हिडीओ लीक झाल्यानंतर येथील काही विद्यार्थिनींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं वृत्तही समोर आलं होतं. मात्र, पोलीस तसेच विद्यापीठ प्रशासनाने हा दावा फेटाळून लावला असून कोणीही आत्महत्या केलेली नसून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. व्हिडीओ लीक झाल्याचे समजल्यानंतर एक विद्यार्थिनी बेशुद्ध पडली. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले आहे.