नवीन नळ जोडणी घेण्यासाठी कोटेशन रकमेमध्ये हफ्ते करून द्या

आमदार प्रणिती शिंदे यांची मनपा आयुक्तांकडे मागणी

सोलापूर- शहर सोलापूर येथील झोपडपट्टी भागामधील सार्वजनिक नळ जोडणी बंद करण्याची कार्यवाही सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने तत्परतेने करण्यात येत आहे. परंतू झोपडपट्टी भागातील गोर-गरीब नागरीकांमध्ये जनजागृती करणे व त्यांना प्रोत्साहित करून कोटेशनचे हफ्ते पाडून नवीन नळ जोडणी घेण्यासाठी प्रवृत्त करण्याची तत्परता महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभाग व झोन कार्यालयाच्या प्रशासनाने दाखविलेली नाही. नवरात्र महोत्सवाची सुरुवात होण्याआधी नागरीक आपल्या घराची साफ-सफाई करत असतात आणि अशा काळातच झोपडपट्टी भागातील सार्वजनिक नळ बंद करून त्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न होत आहे. हा प्रकार गंभीर स्वरुपाचा असून यामुळे नागरीकांमध्ये असंतोषाची भावना पसरलेली आहे. या घटनेची तीव्रता लक्षात घेवून आपण पाणी पुरवठा विभाग व झोन कार्यालयांना झोपडपट्टी भागामधील सार्वजनिक नळ जोडणी बंद करण्याची मोहिम दसरा उत्सव होईपर्यंत स्थगित ठेवण्याच्या सुचना कराव्यात. तसेच या मध्यंतरीच्या काळात झोपडपट्टी भागातील गोर-गरीब नागरीकांमध्ये जनजागृती व त्यांना प्रोत्साहित करून कोटेशनचे हफ्ते करून देवून नवीन नळ जोडणी घेण्यासाठी प्रवृत्त करावे व नवीन नळ जोडणी करून देणे गरजेचे आहे. याबाबतही आपण संबंधितांना सुचना कराव्यात अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे केली आहे. तसेच याप्रकारामुळे नागरीकांमध्ये नाराजीची भावना पसरत असल्याचे आयुक्तांना सांगितले.