औरंगाबाद: मराठवाडा ही पवित्र भूमी असून येथे संतांचे संस्कार, मेहनती तरुण, वाढणारे उद्योग, यासह पर्यटनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. येथील विकासाचे प्रश्न सोडविण्यसाठी आम्ही कटीबद्ध असून विविध विकास कामांसाठी शासन भरीव निधी उपलब्ध करुन देत आहे. तसेच या सर्व कामांचा यापुढे मंत्रालय स्तरावरुन नियमित आढावा घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी विविध विकास कामांच्या घोषणाही मुख्यमंत्र्यांनी आज केल्या. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त् मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते येथील सिद्धार्थ उद्यानात आज ध्वजारोहण करण्यात आले. या निमित्ताने मुक्तिसंग्रामाचा अमृत महोत्सवी वर्षासही आज सुरूवात झाली. या कार्यक्रमास केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सर्वश्री हरिभाऊ बागडे, संजय शिरसाट, अभिमन्यु पवार, प्रशांत बंब, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जून प्रसन्ना, पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जीएसटीचे सहआयुक्त जी. श्रीकांत, सिडकोच्या प्रशासक दीपा मुधोळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटने यांच्यासह, अधिकारी, कर्मचारी, नागरिकाची उपस्थिती होती.