परभणी(प्रतिनिधी)सर्व गरीब सामान्यांसाठी आलेला रेशनच्या तांदळाचा साठा करून या मालाची काळ्या बाजारात चढ्या भावाने विक्री करण्याचा प्रयत्न करणार्‍या आरोपींविरोधात धडक कारवाई करून परभणी पोलिसांनी बुधवारी (दि.15) दिवसभरात चार ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण 185.5 क्विंटल तांदूळ जप्त केला आहे. शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीसह जिल्ह्यातील पूर्णा, जिंतूर आणि गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत या कारवाया करण्यात आल्या. यात पोलीस पथकाने 2 लाख 75 हजार 781 रूपयांंच्या तांदळासह 5 लाख 50 हजारांचे दोन वाहन असा एकूण आठ लाख 25 हजार 781 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात एकूण 8 आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला असून सात आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

परभणीतील कोतवाली पोलीस ठाण्याच्या परिसरात नवा मोंढा भागात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत 60 पोते तांदूळ जप्त केला आहे. यात पोलिसानी एकूण 45 हजार रूपयांचा 30 क्विंटल तांदूळ जप्त केला आहे. या मालाची वाहतूक करण्यात येणारे 2 लाख 50 हजार रूपयांचे वाहन असा एकूण 2 लाख 95 हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई पोउपनि साईनाथ पुयड, पोलीस अंमलदार तुपसुंदरे, खुपसे व रफीक यांच्या पथकाने केली आहे. या प्रकरणी पोउपनि साईनाथ पुयड यांच्या माहितीवरून कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.