फुलंब्री तालुक्यात आठ दिवसांत 3 शेतकऱ्यांना घोणस अळीची बाधा  शेतकऱ्यांनी शेतात काम करत असताना संपूर्ण अंग झाकेल असे कपडे घालावेत शेतात जास्त प्रमाणात घोणस अळी आढळून आली तर बाह्यपर्शी कीटकनाशक फवारावे असे कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांनी सांगितले . तालुक्यात पिकांवर घोणस अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे . शेतात काम करताना या घोणस अळीच्या संपर्कात आल्यामुळे मागील आठ दिवसांत गिरसावळी येथील शेतकरी हिराबाई गाडेकर , रांजणगाव येथील शेतकरी राजू कोंडके व वडोदबाजार येथील पांडुरंग ब्राह्मणे या शेतकऱ्यांना बाधा झाली होती . वेळीच उपचार मिळाल्याने सध्या तिघांची प्रकृती ठीक आहे . याआधी शेतकरी लोकरी मावा , हुमणी अळी , गोगलगायींच्या संकटाचा सामना करत असताना शेतकऱ्यांसमोर आता घोणस अळीचे नवे संकट उभे राहिले आहे . वेळीच उपचार घ्यावेत शेतात काम करताना या घोणस अळीचा शेतकऱ्याच्या शरीराला जिथे संपर्क झाला तेथे विंचू चावल्याप्रमाणे त्रास होतो . नंतर मळमळ होऊन उलट्या होतात . वेळीच उपचार नाही मिळाले तर पक्षघातदेखील होऊ शकतो . यामुळे अशी लक्षणे आढळल्यास शेतकऱ्यांनी वेळीच दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावेत , असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी प्रसन्ना भाले यांनी केले . ही घोणस अळी विषारी असल्याने शेतकरी शेतात जाण्यासाठी धास्तावल्याचे येथील शेतकऱ्यांचे आता तब्येत ठीक आहे : ही घोणस अळी घुल्याप्रमाणेच दिसते . मी मका पिकात असताना ही घोणस अळी अंगावर पडली आणि त्रास सुरू झाला . मला लक्षणे कळाली आणि उपचार घेतले . माझी तब्येत आता ठीक आहे , असे रांजणगाव येथील शेतकरी राजू कोंडके यांनी सांगितले .