उदगीर येथे भरलेल्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे अध्यक्ष  भारत सासणे यांनी लोकसेवा संकुल येथे सपत्नीक भेट दिली. नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या भेटी या शाळेला होत असतात. त्याच उपक्रमाचा भाग म्हणून भारत सासणे यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. आरंभी सासणे यांना सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सैनिकी मानवंदना दिली.  सासणे यांच्या हस्ते २५ हजार वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष  दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून या वृक्षारोपण अभियानाचे आयोजन करण्यात आले. ढोल, ताशांच्या गजरात या अभियानाची सुरुवात झाली. त्यानंतर शाळेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात सासणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. शाल, श्रीफळ, पुणेरी पगडी, पुष्प गुच्छ देऊन तसेच सौ .सासणे यांचा पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.तसेच शाळेतील कलाशिक्षक शंकर साळुंके यांनी चितारलेले  सासणे यांचे रेखाचित्र त्यांना भेट देण्यात आले. कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये हरी उद्धव धोत्रे विद्यालयाचे मुख्याध्यापक  लोंढे , धर्मवीर संभाजी राजे माध्यमिक विद्यालय तुळापूरचे मुख्याध्यापक ए.बी.जाधव , नवीन माध्यमिक विद्यालय, मरकळच्या मुख्याध्यापिका सौ.लाटे ,लोणीकंद प्राथमिक शाळेचे लंघे , लोकसेवा परिवारातील लेखक तानाजी गोरे, युवा स्पंदनचे चेतन धोत्रे प्रा.नरहरी पाटील,  पांडुरंग जगताप, भारत पवार,  तुषार वाघमारे,  ईश्वर पाटील आदींचा उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान भारत सासणे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर  सासणे यांनी मार्गदर्शन केले. 'सत्याची कास धरा' असा मूलमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. भावी आयुष्यात हा मूलमंत्र तुम्हाला उपयोगी येईल असे प्रतिपादन त्यांनी केले. पुस्तक वाचनातून प्रगती करता येते. विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार पुस्तके उपलब्ध करून देण्यात यावीत अशा सूचना त्यांनी शाळेला दिल्या. पुढे ते असेही म्हणाले की, वर्षभर विविध प्रतिभासंपन्न साहित्यिकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना घडवून आणावे व विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण करावी. यावेळी एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाला पाहून व ऐकून सर्व विद्यार्थी भारावून गेले होते.तसेच सर्व विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले होते. यावेळी शिक्षण तज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांनीही आपले विचार मांडले. ते म्हणाले की, पुस्तक वाचल्याने मन प्रसन्न होते. पुस्तकातील ओळी थेट हृदयापर्यंत पोहचतात. म्हणून आपलयाला आवडतात ती पुस्तके वाचावीत. कार्यक्रमाचे प्रास्तविक लोकसेवा प्रतिष्ठानचे संचालक व लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य नरहरी पाटील यांनी केले. तर  पांडुरंग जगताप यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.

या कार्यक्रमाचे संयोजन अर्जुन शिंदे यांनी केले. यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर, लोकसेवा इंग्लिश मिडियम स्कूलचे प्राचार्य डेनसिंग, टेन टी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य पी. शॉपीमॉन, लोकसेवा मुलींची सैनिकी शाळेच्या प्राचार्या लक्ष्मी कुलकर्णी, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख साधना शिंदे यांनी केले.