पाकिस्तान:- 1947 साली भारत-पाकिस्तान फाळणी दरम्यान दोघे बहीण भाऊ वेगळे झाले आणि तब्ब्ल 75 वर्षानंतर एकमेकांना भेटले. हि कोणत्याही हिंदी चित्रपटातली कथा नाही तर खरोखर चित्रपटाला शोभून दिसेल अशी घटना असुन पाकिस्तानच्या करतारपुर येथील गुरुद्वारा दरबार साहिब येथे घडली आहे. सन 1947 सालीफाळणीच्या वेळी भारतात जालंधर येथे राहणारे अमरजित सिंह कुटुंबापासून विभक्त झाले होते. तब्ब्ल 75 वर्षांनी ते पाकिस्तानात करतारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहिब येथे त्यांच्या पाकिस्तानी मुस्लिम बहिणीला भेटले. हा क्षण दोघांसाठीही अकल्पित होताच शिवाय बहीण भावाच्या या भेटीने उपस्थितांचे देखील डोळे पाणावले होते.

अमरजित सिंह यांचे मुस्लिम पालक फाळणीच्या वेळेस पाकिस्तानात स्थलांतरित झाले होते तर ते आणि त्यांची बहीण मागे राहिले होते. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार सिंह आपल्या बहिणीला भेटण्यासाठी व्हिसा घेऊन वाघा बॉर्डरमार्गे पाकिस्तानात पोहोचले. 65 वर्षीय कुलसूमला तिचा भाऊ अमरजित सिंहला भेटल्यावर भावना अनावर झाल्या. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गुरुद्वारा दरबार साहिब येथे व्हीलचेअरवर बसलेले सिंह त्यांची मुस्लिम बहीण कुलसूम अख्तर यांना भेटले. बराच वेळ ते फक्त एकमेकांना मिठी मारून रडत होते.

यावेळी स्थानिक वृत्तपत्राशी बोलताना कुलसूमने सांगितले की, त्यांचे आई-वडील 1947 मध्ये जालंधरच्या उपनगरातून पाकिस्तानात स्थलांतरित झाले होते. तर त्यांचा भाऊ आणि एक बहीण तिथेच राहिले होते. कुलसूम म्हणाली की, तिचा जन्म पाकिस्तानात झाला आहे. फाळणीच्या वेळी तिचा भाऊ आणि एक बहीण भारतातचं असल्याची गोष्ट त्या तिच्या आईकडून ऐकत असत. परत त्यांना तिच्या भाव बहिणीला भेटता येईल असे स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते अशी प्रतिक्रिया कुलसुम यांनी दिली. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी सरदार दारा सिंह हे त्यांच्या वडिलांचे एक मित्र भारतातून पाकिस्तानात आले आणि त्यांनाही भेटले. त्यांनी सांगितले की, यावेळी त्यांच्या आईने सरदार दारा सिंह यांना भारतात सोडल्या गेलेल्या मुला आणि मुलीबद्दल सांगितले. त्यांनी आपल्या गावाचे नाव आणि इतर माहितीही दारा सिंगला दिली. त्यामुळे भावाला भेटण्यासाठी बहीण कुलसूम आणि मुलगा शहजाद अहमद आणि कुटुंबातील इतर सदस्य पाकिस्तानच्या फैसलाबादहून करतारपूरला पोहोचले होते. 

असा झाला संपर्क...

कुलसूमच्या म्हणण्यानुसार, दारा सिंहने आपल्या आईला सांगितले की, त्यांच्या मुलाचे नाव अमरजित सिंग आहे, ज्याला 1947 मध्ये एका शीख कुटुंबाने दत्तक घेतले होते.पाकिस्तानमध्ये कुलसुम यांना भेटल्यानंतर दारा सिंह यांनी त्यांच्या आईला सांगितले की त्यांचा मुलगा जिवंत आहे. परंतु त्यांची मुलगी मरण पावली आहे. आपल्या भावाची माहिती मिळाल्यानंतर कुलसूमन यांनी सिंह यांच्याशी व्हॉट्स अँपवर संपर्क साधला आणि नंतर भेटण्याचा निर्णय घेतला. 

माझ्यासाठी हा धक्काचं ....

यावेळी बोलताना अमरजित सिंह म्हणाले की, जेव्हा त्यांना पहिल्यांदा कळले त्यांचे खरे पालक पाकिस्तानात आहेत आणि ते मुस्लिम आहेत, तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यानंतर त्यांनी स्वतःची समजूत काढली. फाळणीच्या काळात स्वतःच्या कुटुंबियांपासून अनेकांची ताटातूट झाली होती. सिंग म्हणाले की, मला नेहमी माझ्या खऱ्या बहिणी आणि भावांना भेटायचे होते. आपले तीन भाऊ जिवंत असल्याचे कळताच आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, जर्मनीत असलेल्या एका भावाचे निधन झाले आहे.