परभणी(प्रतिनिधी)शहरातील बसस्थानकात चालकाने आपल्या ताब्यातील बस निष्काळजीपणे चालविल्याने बसखाली सापडून एका दिव्यांग व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.9) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी बस चालकाविरूध्द कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयताचे नाव बळीराम गणपती राठोड (वय 45 रा. मालेवाडी ता. गंगाखेड) असे आहे. ते परभणी येथे उपचारासाठी आले होते. बसस्थानकात आले असता शुक्रवारी सकाळी 10 च्या सुमारास बस क्रमांक एमएच 40 वाय 5541 अंबाजोगाई- नागपूर जाणार्या बसच्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालविले. यावेळी तिथेच असलेल्या दिव्यांग बळीराम राठोड यांच्या अंगावरून बसचे चाक गेल्याने ती गंभीर जखमी होवून मृत्यूमुखी पडले. याप्रकरणी मयताचा भाऊ धुराजी गंपु राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुसद आगारातील बस चालक मारोती वाघु कोरडे याच्याविरूध्द कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक टी.एस. फुलपगार हे करीत आहेत. मयत बळीराम राठोड व त्यांची पत्नी दोघेही दिव्यांग असून बळीराम परभणीत उपचारासाठी आले असता ही दुर्घटना घडली. त्यांच्या मृत्यूमुळे मालेवाडी येथे शोककळा पसरली.