केंद्र शासनामार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव Campagin India@७५ अंतर्गत प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2022 या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या विम्याची पावती घरपोच देणारा “माझी पॉलिसी माझ्या हातात” हा उपक्रम रायगड जिल्ह्यामध्ये ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड मार्फत राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन (गुरुवार, दि.8 सप्टेंबर 2022) रोजी आमदार महेश बालदी, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांच्या शुभहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले.
जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2022 अंतर्गत भात व नाचणी ही दोन पिके अधिसूचित आहेत. भात पिकासाठी विमा हप्ता रक्कम 1 हजार 35 रुपये 20 पैसे प्रति हेक्टर असून विमा संरक्षित रक्कम 51 हजार 760 रुपये प्रति हेक्टर इतकी आहे. तर नाचणी पिकासाठी विमा हप्ता रक्कम 400 रुपये प्रति हेक्टर असून विमा संरक्षित रक्कम 20 हजार रुपये प्रति हेक्टर इतकी आहे. खरीप हंगाम 2022 जिल्ह्यामध्ये एकूण 7 हजार 871 शेतकऱ्यांनी पिक विमा उतरविला आहे. यापैकी बँकेमार्फत विमा पॉलिसी घेतलेल्या कर्जदार 2 हजार 283 शेतकरी यांना विमा पॅलिसी वाटप करण्यात येत आहे.
कार्यक्रम उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखडे, कृषी पर्यवेक्षक श्री.सूर्यवंशी, ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीचे जिल्हा समन्वयक शरद कबाडे व तालुका समन्वयक वैभव घरत उपस्थित होते