“जीवनाची हमी बालमृत्यु कमी “ हा अत्यंत महत्वकांक्षी कार्यक्रमाचा शुभारंभ आज दक्षिण सोलापूर तालुक्यांतील औराद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे हस्ते शुभारंभ करणेत आला. सिईओ स्वामी यांच्या संकल्पनेतून सोलापूर जिल्ह्यात या मोहिमेस उत्साहात सुरूवात झाली आहे. स्वत: सिईओ स्वामी यांनी औराद येथे जाऊन अभियानाच्या नियोजनाची पाहणी करून मार्गदर्शन केले यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना सीईओ स्वामी म्हणाले की आरोग्य अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांच्यासह आशा वर्कर्स ग्रामीण भागात आरोग्य सेवा तसेच कुपोषण मुक्तीसाठी नेहमीच चांगले काम करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी साथ देण्याची गरज आहे. गावच्या कारभाऱ्यांनी मनावर घेतल्यास मातामृत्यू व बालमृत्यू कमी करण्यात शासकीय यंत्रणांना निश्चितच यश मिळेल. त्याचबरोबर बालविवाह हा मातामृत्यू व बालमृत्यूस कारणीभूत असलेला महत्त्वाचा घटक आहे. बालविवाहावर जर संपूर्ण प्रतिबंध आणायचा असेल तर प्रत्येक ग्रामस्थांनी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद यंत्रणेतील सर्वजण ही मोहिम यशस्वी करणे साठी प्रयत्न करत आहेत आणि “जीवनाची हमी बालमृत्यु कमी" ही मोहीम आपण नक्कीच यशस्वी कराल याबाबत काहीच शंका नाही.
सर्वप्रथम सीईओ स्वामी यांच्या शुभहस्ते धन्वंतरी पूजन व दिपप्रज्वलन करून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
प्रारंभी तालुका आरोग्य अधिकारी डॉ दिगंबर गायकवाड यांनी आरोग्य विभाग व बालकल्याण विभाग यांनी कोविड काळात उत्तम समन्वय साधत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यापुढेही असाच समन्वय साधून ही मोहीम यशस्वी करू असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी सीईओ स्वामी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करीत असताना येथील आरोग्य कर्मचाऱ्याकडून आपली शुगर तपासणी करून घेतली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ आरती हेसे यांनी स्वामी यांची ब्लड शुगर तपासणी केली.
यावेळी सीईओ स्वामी यांनी काही मातांशी हितगुज साधून त्यांना मिळणाऱ्या आरोग्य सेवेबाबत चौकशी केली.
यावेळी उपस्थित सर्वांना कुपोषण मुक्तीची शपथ देण्यात आली.
यावेळी औरादचे सरपंच शांतकुमार गडदे, दक्षिण सोलापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ दिगंबर गायकवाड, गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे, बालविकास प्रकल्प अधिकारी समाधान नागणे, वैद्यकीय अधिकारी डॉ निलम घोगरे, वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा पवार व आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मल्लिकार्जुन देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा पवार यांनी मानले.