नाशिक : सार्वजनिक गणेश मंडळांसह घराघरांत आगमन झालेल्या बाप्पाच्या आगमनाने सर्वच उत्साह व चैतन्याचे वातावरण आहे. परंपरेनुसार रविवारी पाच दिवसांच्या गणरायाचे विधिवत विसर्जन करण्यात आले. गंगाघाटासह चोपडा लॉन्स, तपोवन, नांदूरमानूर व अन्य ठिकाणच्या मूर्ती संकलनास मोठा प्रतिसाद मिळाला.

सार्वजनिक गणेश मंडळे सर्वसाधारणपणे दहा दिवसांसाठी गणेशाची स्थापना करतात. घरगुती गणेशाची स्थापना दीड, तीन, पाच, सात व दहा दिवस करण्याची प्रथा आहे. अर्थात यामागे कोणतेही शास्त्र नसले, तरी प्रत्येक कुटुंबाच्या परंपरेनुसार हे विसर्जन केले जाते.

शासनाने व्यापक जनजागृती केल्याने यंदा प्लॅस्टर ऑफ पॅरीसपेक्षा शाडू मातीच्या मूर्तींची मोठ्या प्रमाणावर स्थापना झाली आहे. विशेष म्हणजे लोकांत जागरूकता झाल्याने यंदा शाडू मातीच्या मूर्तींच्या मागणीतही २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले. दरम्यान, विसर्जनावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये, म्हणून पोलिसांसह होमगार्डंचा चोख बंदोबस्त होता.

मूर्ती दानास अधिक पसंती

पीओपींच्या मूर्तींमुळे नद्यांसह तलाव, विहिरी, नैसर्गिक नाले यांची अपरिमित हानी होते, असे पर्यावरणप्रेमींचे मत असल्याने ते दरवर्षी शाडू मातीच्या मूर्तीच्या स्थापनेबरोबरच मूर्ती दानाचे आवाहन करतात. यंदाही महापालिकेसह सामाजिक संस्थांच्या मूर्ती दानाला मोठा प्रतिसाद मिळाला. गंगाघाटावर दुपारी चारपर्यंत २३ मूर्तींचे संकलन झाले हाेते. सायंकाळपर्यंत सर्वच ठिकाणी मूर्ती दानास चांगला प्रतिसाद मिळाल्याचे महापालिकेचे संजय दराडे यांनी सांगितले.